मागण्यांच्या पूर्ततेशिवाय हलणार नाही!
By Admin | Updated: December 22, 2014 00:41 IST2014-12-22T00:41:24+5:302014-12-22T00:41:24+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने पटवर्धन मैदानात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. अधिवेशनाच्या दोन आठवड्यात मागण्या पूर्ण न झालेल्या

मागण्यांच्या पूर्ततेशिवाय हलणार नाही!
आंदोलकांचा निर्धार : १३ संघटनांचे धरणे आंदोलन सुरूच
गणेश खवसे - नागपूर
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने पटवर्धन मैदानात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. अधिवेशनाच्या दोन आठवड्यात मागण्या पूर्ण न झालेल्या काही संघटनांचे प्रतिनिधी मागण्यांवर ठाम असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हलणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे.
गेल्या १५ दिवसांत १०० पेक्षा अधिक संघटनांनी धरणे आंदोलन केले. काहींनी साखळी उपोषण तर निवडक संघटनांच्या प्रतिनिधींनी आमरण उपोषण केले. धरणे आंदोलनाला सुरुवात करताच लगेच त्या संघटनांच्या शिष्टमंडळाची संबंधित मंत्री किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून देण्यावर यावर्षी पहिल्यांदा लक्ष केंद्रित करण्यात आले. या भेटीत संघटनांचे समाधान झाल्यास तेथेच त्यांच्या आंदोलनाची सांगता होत होती.
अशाप्रकारे बहुतांश संघटनांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात येत. एकूणच धरणे आंदोलनाला सुरुवात करताच आंदोलकांना फार वेळ धरणे आंदोलन सुरू ठेवावे लागले नाही. मात्र आता अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि अंतिम आठवड्याच्या कामकाजाला सोमवारपासून सुरुवात होणार असली तरी १३ संघटनांचे धरणे आंदोलन, साखळी-आमरण उपोषण संपविण्यात यश आलेले नाही. १३ संघटनांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले असले तरी रविवारी मैदानात आंदोलक तुरळक प्रमाणात होते, हे विशेष!
सध्या पटवर्धन मैदानात आदिवासी कुटुंब कल्याण समिती, अखिल भारतीय अनुसूचित तथा परिगणित जाती सेवक समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमजीवी पत्रकार संघ, दीनदलित ललकार सेना, प्रेस असोसिएशन, आरोग्य सेवा कर्मचारी, अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ, महाराष्ट्र न्याय मंच, मिहान प्रकल्पग्रस्त, वृक्षमित्र, महादुला बिगर शेती ग्रामीण पत सहकारी संस्था मर्यादित, अन्यायग्रस्त संघर्ष समितीचे धरणे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे, धरणे आंदोलन करण्यासाठी एकूण ३१ मंडप उभारण्यात आले आहे. संघटना कमी आणि मंडप जास्त यामुळे मैदान रिकामे दिसून येते.
आमरण उपोषणावर ठाम
धरणे आंदोलन करणाऱ्या संघटना मैदानात असताना लोकस्वराज आंदोलन संघटनेच्या वतीने प्रा. रामचंद्र भरांडे यांनी १५ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी त्यांनी हा मार्ग पत्करला. आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लगेच मेडिकलमध्ये भरती केले. अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आले. त्यानंतर सामान्य वॉर्डमध्ये तीन दिवस ठेवले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्यांना मेडिकलमधून सुटी मिळाली. सुटी मिळताच त्यांनी पटवर्धन मैदानात आमरण उपोषण सुरू केले. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय येथून हटणार नाही, प्राण आहे तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार प्रा. भरांडे यांनी केला.