रसिकांची दाद अन् वन्समोअरची मागणी
By Admin | Updated: January 14, 2015 00:44 IST2015-01-14T00:44:27+5:302015-01-14T00:44:27+5:30
‘मेलॉडी किंग’ किशोर कुमार अन् स्वरकोकिळा लता मंगेशकर यांची गाणी म्हटली की लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच स्वरामृताच्या वर्षावात चिंब भिजून जातात. उपराजधानीच्या थंडीतदेखील

रसिकांची दाद अन् वन्समोअरची मागणी
दंदे फाऊंडेशन : ‘हिट्स आॅफ किशोर कुमार अॅण्ड लता मंगेशकर’
नागपूर : ‘मेलॉडी किंग’ किशोर कुमार अन् स्वरकोकिळा लता मंगेशकर यांची गाणी म्हटली की लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच स्वरामृताच्या वर्षावात चिंब भिजून जातात. उपराजधानीच्या थंडीतदेखील गीतस्वरांनी उब निर्माण केली. दंदे फाऊंडेशन व स्वरतरंग संगीत अकादमीच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘हिट्स आॅफ किशोर कुमार अॅण्ड लता मंगेशकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अगदी ३ वर्षाच्या चिमुकला असो वा ६० वर्षांवरील वय असलेले पण गायनकलेचे ‘फ्रेशर्स’ विद्यार्थी असो किंवा सिनेमात ‘प्लेबॅक’ करणारे गायक कलावंत असो, सर्वांनाच रसिकांनी भरभरून दाद दिली. अप्रतिम सादरीकरण अन् स्वरगंधाने नटलेल्या या कार्यक्रमाने वेगळीच उंची गाठली.
गायनाचे बाळकडू घेणाऱ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ प्रदान करून देत नव्या उमेदीच्या कलाकारांना घडविण्याचा मानस व्यक्त करीत या कार्यक्रमाचे आयोजन दंदे फाऊंडेशन व स्वरतरंग संगीत अकादमीच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आमदार अनिल सोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. दंदे फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. पिनाक दंदे यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. यावेळी व्यावसायिक ओमप्रकाश अग्रवाल, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते. रघुनंदन बोबडे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ चिमुकल्यांनी ‘ईश्वर या अल्लाह’ या गीताने केली. यानंतर मुलींनी गायलेल्या ‘नैनो मे बदरा छाये’या गीतावर रसिकांची दाद मिळाली अन् हा कार्यक्रम फु लत गेला. श्रेया खराबे हिने गायलेल्या ‘रस्मे-उल्फत’ या गीताने लता मंगेशकर यांची आठवण करून दिली. श्रीनिधी घटाटे हिने पाकिजा या चित्रपटातील ‘चलते चलते यु ही कोई’ हे गीत सादर करीत आपल्या गुरुंचे स्मरण केले.
ंचिमुकला अमृत चन्नेवार याने सादर के लेली ‘वादा तेरा वादा’ ही कव्वाली भाव खाऊन गेली. गौरी गायकवाड हिने गायलेल्या ‘बय्या ना धरो’ या गीतावर वाहवा मिळविली. भाग्यश्री वाटकर हिने ‘आपकी नजरोने समझा’ व धनश्री वाटकर हिने ‘तू जहा जहा चलेंगा’ हे गीत सादर के ले. गार्गी कुणावार हिने सादर केलेले ‘ये समा, समा है ये प्यार का’ हे गीत अप्रतिम ठरले. वर्षा हेडाऊ व श्रद्धा यांनीही गीते सादर केली. मुलांच्या समूह गीतासोबतच मोठ्याची समूहगीते यावेळी सादर करण्यात आली. मोठ्यांनी गायलेले ‘जरुरुत है, जरुरत है’ तर लहान मुलींनी सादर केलेले ‘मै चली मै चली’ ही गीते कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. वाद्यवृंदांवर प्रसन्न वानखेडे, महेंद्र ढोले, अक्षय आचार्य, रघुनंदन परसवार, सुमंत बोबडे, सुभाष वानखेडे, पंकज यादव यांनी सुरेल साथसंगत केली. निरंजन बोबडे यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली तर श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)