लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पाळावे. कोणतेही निकष न लावता, कुठलाही भेदभाव न करता लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावे, अशी मागणी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.
सध्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याऐवजी आवडत्या नावडत्या आमदारांचीच अधिक चर्चा आहे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांचीच ओळख आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागत आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप नाही त्यामुळे अधिवेशनात एकही मंत्री प्रश्नांची उत्तरे देत नसल्याचे चित्र आहे. हे अधिवेशन म्हणजे विनोदच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नेहरू, सावरकरांवर टीका करणे दोघांनीही सोडावे
काँग्रेसने यापुढे वीर सावरकरांवर आणि भाजपने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करू नये. दोन्ही पक्षांनी भविष्याबद्दल बोलले पाहिजे. गत काळात परिस्थितीनुसार या महापुरुषांनी जे शक्य होते ते केले, असा सल्ला देत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचे काय झाले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.