... तर तत्कालीन डीजी संजय पांडेंवर गुन्हा; स्टिंगच्या 'त्या' क्लिपची एसआयटीमार्फत चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 05:44 IST2024-12-18T05:41:18+5:302024-12-18T05:44:56+5:30
संजय पांडे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

... तर तत्कालीन डीजी संजय पांडेंवर गुन्हा; स्टिंगच्या 'त्या' क्लिपची एसआयटीमार्फत चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मविआ सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचा दावा एका स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विधानपरिषदेत सत्ताधारी बाकांवरील प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर संबंधित ऑडिओ क्लिप्स व एकूण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल व त्यात दोषी आढळल्यास तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
या क्लिपमध्ये एसीपी सरदार पाटील एका अज्ञात व्यक्तीशी बोलत असून त्यात ते संजय पुनामिया यांच्यावर गुन्हा दाखल करून फडणवीस-शिंदे यांना अडकवण्याबाबत बोलत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. संबंधित क्लिप मी पेन ड्राइव्हमधून सभागृहात आणली आहे. संजय पांडे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते.
संजय पुनामिया यांनी शेखर जगताप, एसीपी सरदार पाटील आणि काही लोकांविरोधात तक्रार केली. त्यात जो जबाब दिला तो धक्कादायक आहे. या षडयंत्रामागे नेमका कुणाचा चेहरा आहे हे समोर आले पाहिजे, अशी भूमिका दरेकर यांनी मांडली. त्यांनी एसआयटी स्थापन करा, उपायुक्त पाटील यांना निलंबित करा व अॅड. शेखर जगताप यांची सरकारी पॅनलमधून हकालपट्टी करा, अशी मागणी केली. यावर शंभूराज देसाई यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्यात येईल. त्यात इतर अधिकारीदेखील असतील असे स्पष्ट केले. सोबतच अॅड. जगताप यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांच्यावर अधिवेशन संपण्याअगोदर कारवाई होईल. असे सांगितले.
महासंचालक स्वतःहून असे करणार नाहीत...
शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाच्या सूत्रधाराबाबत शंका उपस्थित केली. महासंचालक अशा प्रकारचे षडयंत्र स्वतः रचण्याची हिंमत करणार नाहीत. त्यामागे दुसराच कुणीतरी सूत्रधार आहे. याचे उगमस्थान शोधलेच पाहिजे. हे प्रकरण दुर्लक्ष करण्यासारखे नाही. सत्तेचा दुरुपयोग करून जे लोकाभिमुख नेते आहेत त्यांना पोलिस विभागाला हाताशी धरून असा प्रयत्न झाला असेल तर सरकार याबाबत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. निष्पक्षपणे एसआयटी चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त करून तत्काळ कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात दिली.