लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. होय, मी नाराज आहे. मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, ओबीसींचा लढा मी लढलो. त्याचे बक्षीस मिळाले, अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. तसेच मंत्रिपद कितीवेळा आले आणि गेले, तरी भुजबळ संपला नाही, असेही ते म्हणाले. विधानसभेचे पहिल्या दिवसाचे कामकाज संपताच भुजबळ सभागृहाबाहेर पडले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी आपली नाराजी उघड केली. ते म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय, काय फरक पडतो. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठे यश मिळाले. अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. भुजबळ शपथविधीला उपस्थित नव्हते. मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. शेवटी त्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपताच ते नाशिकसाठी रवाना झाले. तेथे समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन ते भेटणार आहेत.
राज्यसभेवर जाणार नाही
सात-आठ दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी मला राज्यसभेवर जायचे असेल तर जा, असे सांगितले. मला जायचे होते तेव्हा संधी दिली नाही. आता विधानसभेला तुमच्याशिवाय येवला जिंकू शकत नाही, असे म्हणाले म्हणून लढलो व मोठ्या फरकाने जिंकलो. आता राज्यसभेवर जायचे म्हटले तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. ही माझ्या मतदारसंघातील मतदारांशी प्रतारणा ठरेल. हे सर्व दुःखदायक आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.