भेटीने बदलाचा प्रारंभ! देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा; भेट कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 05:06 IST2024-12-18T05:04:22+5:302024-12-18T05:06:17+5:30

एकमेकांमध्ये टोकाची कटूता आलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. या भेटीने बदलाला सुरुवात झाली की, कटूता कायम राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

winter session maharashtra 2024 closed door discussion between cm devendra fadnavis and uddhav thackeray the meeting marks the beginning of change | भेटीने बदलाचा प्रारंभ! देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा; भेट कशासाठी?

भेटीने बदलाचा प्रारंभ! देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा; भेट कशासाठी?

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : 'मी बदल्याचे नाही, तर बदलाचे राजकारण करणार', असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच सांगितले होते, त्या बदलाला प्रारंभ झाल्याचे चित्र मंगळवारी विधानभवनाच्या साक्षीने बघायला मिळाले. एकमेकांमध्ये टोकाची कटूता आलेले फडणवीस आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. या भेटीने बदलाला सुरुवात झाली की, कटूता कायम राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

'एक तर तो राहील किंवा मी', असे आव्हान ठाकरे यांनी फडणवीसांबाबत दिले होते. ठाकरे यांनी फडणवीस हे राज्याला कलंक असल्याचे विधान नागपुरात केले होते. फडणवीस यांनीही प्रचारकाळात ठाकरेंवर अनेकदा हल्लाबोल केला होता. आज विधानभवनात ते फडणवीस यांना भेटायला त्यांच्या मुख्यमंत्री दालनात गेले. फडणवीस यांनीही 'जणू काही घडलेच नव्हते', अशा पद्धतीने हसत व जिव्हाळ्याने त्यांचे स्वागत केले. ठाकरे यांनी फडणवीस यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोघांनी हस्तांदोलन केले. अनेक महिन्यांनंतर हे दोन नेते एकमेकांना भेटले. यावेळी उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे, भाचे आ. वरुण सरदेसाई, माजी मंत्री भास्कर जाधव, अनिल परब आदी उपस्थित होते. त्यानंतर फडणवीस व ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा झाली.

भेट कशासाठी? 

उद्धवसेनेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देण्यासंदर्भात यावेळी फडणवीस-ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. या पदासाठी संख्याबळाची कोणतीही कायदेशीर अट नाही, असा मुद्दाही समोर आला आहे. विरोधी पक्षात उद्धवसेनेचे सर्वाधिक २० आमदार आहेत. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट होती, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर किंवा शत्रुत्व असे काही नाही. चांगले असेल त्याचे आम्ही समर्थन करू. जे चुकीचे असेल त्यावर टीका करू. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसेना

Web Title: winter session maharashtra 2024 closed door discussion between cm devendra fadnavis and uddhav thackeray the meeting marks the beginning of change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.