परभणी-बीडवरून संताप, विरोधकांचा सभात्याग; सरपंच हत्येप्रकरणी उद्या स्वतंत्र चर्चा: अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 05:31 IST2024-12-18T05:29:47+5:302024-12-18T05:31:41+5:30

माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील घटनेनंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जनतेत उद्रेक आहे, याकडे लक्ष वेधले.

winter session maharashtra 2024 anger over parbhani beed opposition walks out | परभणी-बीडवरून संताप, विरोधकांचा सभात्याग; सरपंच हत्येप्रकरणी उद्या स्वतंत्र चर्चा: अध्यक्ष

परभणी-बीडवरून संताप, विरोधकांचा सभात्याग; सरपंच हत्येप्रकरणी उद्या स्वतंत्र चर्चा: अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणी सरकार गंभीरपणे कारवाई करत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत सभात्याग केला.

माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील घटनेनंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जनतेत उद्रेक आहे, याकडे लक्ष वेधले. सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या लाठीमारात झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत हृदयविकाराचा झटका येऊन दलित चळवळीचे खंदे नेते विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला. याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. 

सरकारला परभणीच्या घटनेचे गांभीर्य नाही, असा आरोप पटोले यांनी केला. सरकारने तत्काळ आजच चर्चा घेतली नाही तर या घटनेचे आणखी पडसाद उमटतील, असे राऊत म्हणाले. त्यावर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, परभणीच्या घटनेप्रकरणी बुधवारी चर्चा सभागृहात होईल, असे मी कालच सभागृहात हा विषय आला तेव्हा सांगितले होते. त्यानुसार ही चर्चा होणार आहे. सरकारला गांभीर्य नसते तर स्वतंत्र चर्चा घेतली नसती. सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवायचे की नाही या शब्दांत त्यांनी विरोधकांना समज दिली.

अटक का नाही? : क्षीरसागर

शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण उचलले. ते म्हणाले की, ही हत्या अत्यंत निघृणपणे दिवसाढवळ्या करण्यात आली. तीन आरोपींना पकडले आहे; पण चार जण फरार आहेत. या हत्याप्रकरणात वाल्मीक कराड ही व्यक्त्ती आहे, ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे; पण अजून मोकाट आहे. त्याला तत्काळ अटक करा. त्याचे आणि आरोपींचे गेल्या काही महिन्यांतील कॉल रेकॉर्ड तपासा, वाल्मीक कराडचा या हत्येतील सहभाग समोर येईल, असे क्षीरसागर म्हणाले. बीड जिल्ह्यात या हत्येप्रकरणी मोठा असंतोष आहे, मोठे आंदोलन उभे राहील, मोर्चे निघतील. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखा. मुख्यमंत्री महोदय आपण आव्हान म्हणून गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती, तशीच आता बीडचे गुन्हेगारीकरण थांबविण्यासाठी जबाबदारी घ्या असे आवाहन क्षीरसागर यांनी केले. भाजपच्या नमिता मुंदडा यांनी सभागृहात संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

होय, वाल्मीक कराड माझे जवळचे : मुंडे

वाल्मीक कराड हे माझे निकटवर्तीय आहे, अशी कबुली मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र सरपंच संजय देशमुख यांच्या खून प्रकरणात माझा संबंध लावला जातोय, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्री प्रकरणात सविस्तर निवेदन करणार आहे. देशमुख यांचा खून ही दुर्दैवी घटना आहे, या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे ते म्हणाले.
 

Web Title: winter session maharashtra 2024 anger over parbhani beed opposition walks out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.