हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 21:37 IST2025-11-07T21:34:33+5:302025-11-07T21:37:26+5:30
२६ नोव्हेंबरपासून मुंबईहून साहित्याचे आगमन सुरू होईल, तर अधिकारी व कर्मचारी २७ नोव्हेंबरपर्यंत नागपुरात पोहोचतील अशी शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
आनंद डेकाटे
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे. हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होऊन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. नागपूर विधानभवन सचिवालयाचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होईल.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ठेकेदारांकडून अधिवेशनाच्या तयारीची कामे बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर, यंदा सत्र मुंबईतच होईल अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्रात आठ ते दहा दिवसांचा विलंब होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य केल्याने या चर्चांना अधिक वेग आला होता.
मात्र, विधानभवन सचिवालयाने शुक्रवारी नागपूर विधानभवनातील कक्ष अधिकारी कैलाश पाझारे आणि स्नेहलता खोब्रागडे यांना पत्र पाठवून स्पष्ट केले की, सत्र ८ डिसेंबरलाच सुरू होईल. पत्रात विधानभवनातील पीठासीन अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्या कक्ष व निवास व्यवस्थेची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबरपासून मुंबईहून साहित्याचे आगमन सुरू होईल, तर अधिकारी व कर्मचारी २७ नोव्हेंबरपर्यंत नागपुरात पोहोचतील अशी शक्यता आहे.
पहिल्याच दिवशी सादर होणार पूरक मागण्या
हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम १९ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला असून, सत्राचे दिवस वाढण्याची कोणतीही शक्यता नाही. दोन आठवड्यांच्या या सत्रात एकूण १० दिवसांचे कामकाज प्रस्तावित आहे. सत्राच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकार पूरक मागण्या सादर करणार आहे, तर १० डिसेंबरला त्यावर चर्चा आणि मतदान होईल. त्यानंतर पूरक मागण्या मंजूर केल्या जातील.