वादळी पावसाने धान जमीनदोस्त
By Admin | Updated: November 18, 2014 00:54 IST2014-11-18T00:54:46+5:302014-11-18T00:54:46+5:30
मौदा तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. या वादळामुळे कापणीला आलेले धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. पावसामुळे धानाची अर्थात

वादळी पावसाने धान जमीनदोस्त
शेतकरी संकटात : तांदळाची प्रत खालावण्याची शक्यता
तारसा / कोदामेंढी : मौदा तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. या वादळामुळे कापणीला आलेले धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. पावसामुळे धानाची अर्थात तांदळाची प्रत खालावण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.
धान हे मौदा तालुक्यातील नगदी पीक होय. सध्या हलक्या वाणाचे धानाचे पीक कापणीला आले आहे. काही ठिकाणी कापणीला सुरुवातही करण्यात आली. रविवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजताच्या दरम्यान तारसा व परिसरातील शिवारांमध्ये जोरदार वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तारसा, निमखेडा, बानोर, इसापूर, धनी, वीरशी, नवेगाव आष्टी, बाबदेव, चाचेर, नेरला, नंदापुरी, बारशी यासह अन्य ठिकाणचा धान अक्षरश: जमीनदोस्त झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक ऐनवेळी हिरावण्याची शक्यता बळावली आहे.
कोदामेंढी परिसरात रविवारी सायंकाळी वादळासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे या परिसरातील धानाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले.
सध्या या परिसरातील धानाचे पीक अंतिम टप्प्यात आहे. हा धान हल्ली कापणीला आला असला तरी, जवळपास ९० टक्के धानाचे पीक शेतातच आहे. काहींनी कापणी केली असून, धानाच्या पेंड्या बांध्यातच पडल्या आहेत. रविवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसाच्या सरींमुळे या पेंड्या भिजल्या असून, वादळामुळे शेतातील कापणीला आलेला उभा धान आडवा झाला आहे.
या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका कोदामेंढी, अरोली, तुमान, तरोडी, सावंगी शिवाडौली, तांडा, महालगाव, पिंपळगाव, वायगाव, मुरमाडी, सुकळी, खिडकी, तोंडली, वाकेश्वर, श्रीखंडा, इंदोरा, नांदगाव, खरडा, बेरडेपार, खंडाळा, भांडेवाडी, अडेगाव, बोरी (घिवारी), वाघबोडी, कथलाबोडी, धानोली शसह अन्य शिवारातील धाना पीकाला जबरदस्त फटका बसला आहे.
या परिसरात धानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, कृषी अथवा महसूल विभागाच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने नुुकसानग्रस्त शेतांची साधी पाहणी केली नाही, असे या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)