आशीष राय लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) केलेल्या प्रचंड वीज दरवाढीमुळे महावितरणचे कार्यरत अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी नाराज आहेत. कारण, त्यांना वाटते की यामुळे केवळ अदानी, टाटा आणि टोरेंटसारख्या खासगी कंपन्यांनाच फायदा होईल. या तिन्ही कंपन्यांनी राज्यातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये समांतर परवान्यांसाठी अर्ज केले आहेत, जिथे महावितरण ही एकमेव वीज वितरक आहे. जर खासगी कंपन्यांनी आपले दर महावितरणच्या तुलनेत कमी ठेवले, तर या भागांतील बहुतांश ग्राहक महावितरणकडून वीज घेणे बंद करतील, अशी भीती आहे.
एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने 'लोकमत शी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एमईआरसीच्या मार्च महिन्यातील आदेशाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करून चूक केली. त्या आदेशात सर्व प्रकारच्या ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला होता. मात्र, आयोगाने आता याच निर्णयातून यू-टर्न घेतला असून, सर्वच ग्राहकांसाठी दरात मोठी वाढ केली आहे. राजकारणी आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जरी दरकपात झाली असल्याचे सांगत असले, तरी सामान्य ग्राहकांना त्याचे खरे चित्र लवकरच समजेल. कारण नवीन दरानुसार बिलं आल्यानंतर दरवाढीचा फटका स्पष्टपणे जाणवेल.
महावितरणमधील एका कार्यरत अधिकाऱ्याने सांगितले की, अदानी, टाटा आणि टोरेंट यांच्याकडे महावितरणच्या तुलनेत नैसर्गिक फायदा आहे. कारण या खासगी कंपन्यांना शेतकरी व झोपडपट्टीमधील ग्राहकांसारख्या अनुदानित ग्राहकांना वीज पुरवायची गरज नाही. त्यामुळे त्यांचे दर स्वाभाविकच कमी असतील. त्या केवळ औद्योगिक, व्यावसायिक आणि उच्च व मध्यमवर्गीय गृह ग्राहकांकडे लक्ष देतील आणि हे ग्राहक वीज दर कमी असल्यामुळे सहजपणे त्यांच्याकडे वळतील. हे म्हणजे अप्रत्यक्ष खासगीकरणच आहे.
तसेच, दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खासगी कंपन्या महावितरणच्या वितरण जाळ्याचा वापर करून चांगले पैसे देणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे वळवतील. या कंपन्यांना जाळे वापरासाठी काही शुल्क द्यावे लागेल, पण ते एमईआरसी ठरवेल, महावितरण नव्हे. आम्ही जरी खूप जास्त शुल्क मागितले तरी एमईआरसी ते नियमांनुसार कमी करून देईल. त्यामुळे आम्हाला स्पर्धेत टिकून राहता येणार नाही.
महावितरणमधील एका कनिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, जेव्हा वीजपुरवठा खंडित होईल, तेव्हा त्या दोषाचे खापर आमच्यावर फोडले जाईल. कारण खासगी कंपन्याही आमच्या जाळ्याचा वापर करतील. त्या त्यांच्या ग्राहकांना सांगतील की खंडित वीजपुरवठा त्यांच्या नियंत्रणात नाही. त्यामुळे स्वस्त वीज दिल्याबद्दल श्रेय त्यांना मिळेल, पण अपयशाचं दोषारोपण मात्र आमच्यावर होईल. जर राज्य सरकार आणि एमईआरसी यांना खरंच समान संधी असलेली स्पर्धा हवी असेल, तर खासगी कंपन्यांनी स्वतःचं वितरण जाळं उभारावं. त्यानंतर त्यांच्या ग्राहकांच्या त्रासाबद्दल आमच्यावर जबाबदारी येणार नाही.
मुंबईतील सध्याचे घरगुती वीज दर (प्रति युनिट)युनिट्सचा स्लॅब महावितरण टाटा अदानी० ते १०० युनिट्स ५.१४ रुपये ४.७६ रुपये ५.८३ रुपये१०१ ते ३०० युनिट्स १२.५७ रुपये ७.९६ रुपये ८.८८ रुपये३०१ ते ५०० युनिट्स १६.८५ रुपये १३.५५ रुपये ९.८८ रुपये५०० पेक्षा अधिक १९.१५ रुपये १४.५५ रुपये ११.११ रुपये