शरीरावरील जन्मजात डागामुळे देशसेवेचे स्वप्न भंगणार का?
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 9, 2024 12:44 IST2024-12-09T12:43:33+5:302024-12-09T12:44:08+5:30
Nagpur : अपात्रतेच्या आदेशाविरुद्ध शेतकरीपुत्राची हायकोर्टात धाव

Will the birth mark on the body break the dream of national service?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकरीपुत्राने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात धाव घेऊन शरीरावरील जन्मजात डागामुळे देशसेवेचे स्वप्न भंगणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. या शेतकरीपुत्राला केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या नोकरीकरिता अपात्र ठरविण्यात आले आहे.
सिद्धांत तायडे, असे शेतकरीपुत्राचे नाव असून, तो खामगाव येथील रहिवासी आहे. त्याच्या पायावर जन्मजात पांढरा चट्टा आहे. त्यामुळे त्याला २६ ऑक्टोबर २०२४ रोजी अपात्र ठरविण्यात आले आहे. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित जाहिरातीनुसार सिद्धांतने सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदाकरिता अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यानंतर त्याने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली व शारीरिक चाचणीतही त्याला पात्र ठरविण्यात आले. परंतु, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा वैद्यकीय तपासणी अहवाल त्याच्या स्वप्नाआड आला आहे. त्यावर सिद्धांतचा आक्षेप आहे.
केंद्रीय गृह विभागाला नोटीस
या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक बाबी लक्षात घेता केंद्रीय गृह विभागाचे सचिव, केंद्रीय राखीव पोलिस बलाचे महासंचालक, नागपूर केंद्राचे उप-पोलिस महानिरीक्षक व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांना नोटीस बजावून येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत स्वत:ची बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच, अंतरिम आदेश देण्याकरिता याचिकेवर १२ डिसेंबरला सुनावणी निश्चित केली.
वादग्रस्त आदेश अवैधच
ॲड. स्वप्निल वानखेडे यांनी न्यायालयासमक्ष सिद्धांतची बाजू मांडताना अपात्रतेचा वादग्रस्त आदेश अवैधच आहे, असा दावा केला. 'अशोक दुखिया' प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने शरीरावरील जन्मजात डागामुळे उमेदवाराला सशस्त्र दलाच्या नोकरीकरिता अपात्र ठरविले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि लता मंगेशकर रुग्णालयाने सिद्धांतच्या पायावरील चट्ट्यामुळे दैनंदिन कर्तव्य बजावण्यात कोणताही अडथळा निर्माण होत नाही, असा अहवाल दिला आहे, याकडे ॲड. वानखेडे यांनी हा दावा करताना लक्ष वेधले.