टेंभूरडोह ग्रा.पं.ला स्थिरता लाभेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:38+5:302021-01-13T04:19:38+5:30
काँग्रेस आणि भाजप समर्थित गटात थेट लढत दीपक नारे बडेगाव : सावनेर तालुक्यातील बडेगाव जि.प. सर्कलमध्ये मोडणारी टेंभूरडोह ग्रामपंचायत ...

टेंभूरडोह ग्रा.पं.ला स्थिरता लाभेल का?
काँग्रेस आणि भाजप समर्थित गटात थेट लढत
दीपक नारे
बडेगाव : सावनेर तालुक्यातील बडेगाव जि.प. सर्कलमध्ये मोडणारी टेंभूरडोह ग्रामपंचायत गत पंचवार्षिक काळात राजकीय उलथापालथीमुळे अस्थिर आणि कायम चर्चेत राहिली. यावेळी येथे काँग्रेस आणि भाजप समर्थित गटात एकास एक अशीच लढत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील विजयामुळे येथे काँग्रेस समर्थकांच्या आशा बळावल्या आहेत. इकडे टेंभरडोहला स्थिरता देण्यासाठी भाजपप्रणीत पॅनल पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे.
येथे काँग्रेसप्रणीत ग्रामविकास पॅनलकडून वॉर्ड क्र.१ मधून दीपक कवडू साहारे, उषा किशोर पाहाडे, वाॅर्ड क्र.२ मधून मोरेश्वर संतोष चवनारे, सविता मनोहर मेश्राम-शेंडे, वाॅर्ड क्र.३ मधून अंकुश मुरलीधर कुंभरे, शुभांगी कमलाकर मडके आणि संगीता बंडू राऊत रिंगणात आहे. येथे प्रेमचंद मडके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजपप्रणीत ग्रामपरिवर्तन पॅनलकडून वाॅर्ड क्र. १ मधून सुनील ताराचंद पाहाडे, निर्मला तेजराम डहाट, वाॅर्ड क्र. २ मधून मुरलीधर अजाब देहारी, रागिणी प्रवीण नस्कोल, वाॅर्ड क्र. ३ मधून मोरेश्वर आनंद धुर्वे, सरिता अमर तांडेकर आणि अनीता लीलाधर वांगरुके हे नशीब आजमावित आहेत. येथे शरद मंजेवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कोच्छी प्रकल्पामुळे गावाला धोका असल्यामुळे गावाचे पुनर्वसन करणे या प्रमुख मुद्द्यावर काँग्रेस गटाकडून निवडणूक लढवली जात आहे. मागील निवडणुकीत येथे भाजपप्रणीत पॅनलला ७ पैकी ५ जागा मिळाल्या होत्या. मागील पाच वर्षे राजकीय अस्थिरता आणि चढाओढीमुळे कायम चर्चेत राहिलेल्या टेंभूरडोह-महारकुंड गट ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार यावेळी गावाला स्थिरता देण्यासाठी योग्य उमेदवारांची निवड करतील का, याकडे तालुक्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.
टेंभरडोह ग्रा.पं.
एकूण वॉर्ड - ३
एकूण उमेदवार - ७
एकूण मतदार : ११६५
पुरुष मतदार : ५८८
महिला मतदार : ५७७