कोरोनाची दुसरी लाट तीव्र असणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 21:15 IST2020-11-07T21:13:58+5:302020-11-07T21:15:02+5:30
second wave of corona शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाची सामूहिक प्रतिकार शक्ती तयार झाली आहे का, हे पाहण्यासाठी मागील महिन्यात करण्यात आलेले ‘सिरो सर्वेक्षण’ पूर्ण झाले आहे.

कोरोनाची दुसरी लाट तीव्र असणार का?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाची सामूहिक प्रतिकार शक्ती तयार झाली आहे का, हे पाहण्यासाठी मागील महिन्यात करण्यात आलेले ‘सिरो सर्वेक्षण’ पूर्ण झाले आहे. सोमवारी मेडिकलच्या पीएसएम विभागाकडून याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या अहवालावरून कोरोनाची दुसरी लाट तीव्र राहणार का, याबाबत स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
ज्यांना न कळत कोविड होऊन गेलेला आहे, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये कोविड अॅन्टिबॉडीज वाढले असतात. याला वैद्यकीय भाषेत ‘क्लिनिकल इन्फेक्शन’ म्हणतात. अशा संसर्गाचे किती लोक असावेत याचा अंदाज घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याील १३ तालुके व महानगरपालिकेच्या १० झोनमधील ४००० हजार लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. यात अॅन्टिबॉडीज तपासणी करून निष्कर्ष काढण्यात आले. हे सिरो सर्वेक्षण विभागीय आयुक्तांच्या निर्देशनात मेडिकलच्या पीएसएम विभागाने केले. सोमवारी या संदर्भातील अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
अॅन्टिबॉडीज वाढलेल्या असतील तर सामान्य लाट
सर्वेक्षणात ४० ते ५० टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडीज वाढलेल्या असल्याचे समोर आल्यास कोरोनाची येणारी दुसरी लाट सामान्य असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे या अहवालाकडे वैद्यकीय क्षेत्रासोबतच, आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.