लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या सर्वागीण विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. 'दिल्ली-नागपूर-हैदराबाद इंडस्ट्रियल कॉरिडॉर', 'नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग' आणि प्रस्तावित 'शक्तिपीठ विदर्भ-गोवा महामार्ग' या तीन महत्त्वाच्या दळणवळण प्रकल्पांचा संगम साधत, भारतातील पहिले 'गोल्डन ट्रॅगल' आर्थिक क्षेत्र विदर्भात निर्माण करण्याची मागणी केली आहे.
या प्रस्तावानुसार, नागपूर हे तीन महत्त्वाच्या महामार्गाचे केंद्रबिंदू ठरेल आणि त्यामुळे विदर्भाचा आर्थिक नकाशा पूर्णपणे बदलू शकतो. दिल्ली-नागपूर-हैदराबाद औद्योगिक मार्गास केंद्र शासनाची मंजुरी मिळण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ पुढाकार घेण्याची गरज आहे. हा केवळ दळणवळण प्रकल्प नसून, विदर्भाच्या शेतकऱ्यांचे दुःख कमी करणारा आणि तरुणांना रोजगार मिळवून देणारा मार्ग आहे, असे स्पष्ट करत डॉ. राऊत यांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्य-केंद्र समन्वय साधावा व या प्रकल्पास मंजुरीसाठी केंद्र सरकारशी तातडीने चर्चा करावी. शक्तिपीठ महामार्गास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा द्यावा व विदर्भ-गोवा महामार्गाला विशेष प्राधान्य देऊन विकासात गती आणावी. मिहान व ड्राय पोर्टमध्ये मालवाहतूक सुविधा उभारण्यासाठी जागा व सवलती देण्यात याव्यात, अशी मागणीही डॉ. राऊत यांनी केली आहे.
'गोल्डन ट्रॅगल' प्रकल्पाचे फायदे
- १ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता, उत्पादन, वाहतूक व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल.
- विदर्भाला गोव्याच्या बंदरांशी थेट जोडणी, निर्यातक्षम वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे शक्य होईल.
- मिहान व ड्राय पोर्टचे पुनरुज्जीवन होईल व नागपूर हे देशातील सर्वात मोठे अंतर्देशीय मालवाहतूक केंद्र बनवता येईल.
- समृद्धी महामार्ग व नव्या महामार्गामुळे शेतमालाची बाजारपेठांपर्यंत पोहोच सुकर होईल, तसेच ताडोबा, मेलघाट यांसारख्या पर्यटनस्थळांना जलद जोडणी मिळेल.