‘घड्याळ’ अलार्म देणार की टिकटिक बंद पडणार ? तीन सदस्यीय प्रभागामुळे राष्ट्रवादीची पुन्हा गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 07:00 IST2022-01-13T07:00:00+5:302022-01-13T07:00:17+5:30
Nagpur News या निवडणुकीत ‘घड्याळ’ विजयाचा अलार्म देणार की टिकटिक बंद पडणार, यावरच राष्ट्रवादीचे नागपुरातील भविष्य अवलंबून आहे.

‘घड्याळ’ अलार्म देणार की टिकटिक बंद पडणार ? तीन सदस्यीय प्रभागामुळे राष्ट्रवादीची पुन्हा गोची
कमलेश वानखेडे
नागपूर : काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे यावेळीही राष्ट्रवादीवर महापालिकेत एकटे लढण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीन निवडणुकांचा इतिहास पाहता, राष्ट्रवादीचा ग्राफ सतत घसरला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल सक्रिय झाले आहेत. मात्र, त्यानंतरही तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत राष्ट्रवादीचे उमेदवार किती तग धरतील, याचीच चिंता राष्ट्रवादीच्या नेत्यांना सतावत आहे. या निवडणुकीत ‘घड्याळ’ विजयाचा अलार्म देणार की टिकटिक बंद पडणार, यावरच राष्ट्रवादीचे नागपुरातील भविष्य अवलंबून आहे.
नागपुरात राष्ट्रवादीला तगड्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मात्र, सामान्य मतदारांचे समर्थन मिळालेच नाही. गेल्या १५ वर्षात राष्ट्रवादीला महापालिकेत दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. २००७मध्ये ९ जागा जिंकणारी राष्ट्रवादी २०१७पर्यंत फक्त एकवर आली. २०१२मध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करत ३० जागा दिल्या होत्या. मात्र, काँग्रेसचा हात पकडूनही राष्ट्रवादीला धावता आले नाही. फक्त ६ जागा जिंकण्यात यश आले. २०१७मध्ये महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. सुमारे ५० ते ६० हजार मतदारांचा एक प्रभाग होता. प्रभागाचा विस्तार मोठा असल्यामुळे अपक्ष, छोटे पक्ष तसेच संघटन बांधणी नसलेल्या पक्षांना फटका बसला. राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद कमी पडली. राष्ट्रवादी तब्बल ११० जागांवर लढली. सोबतीला प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीरिपा होती. मात्र, फक्त एकच जागा जिंकता आली.
गेल्या तीन निवडणुकीत राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स
- २००७ : एक सदस्यीय प्रभाग होता. गिरीश गांधी अध्यक्ष होते. काँग्रेससोबत आघाडी नव्हती. ९ जागा जिंकल्या.
- २०१२ : दोन सदस्यीय प्रभाग होता. अजय पाटील शहराध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी होती. ३० जागा लढल्या. ६ नगरसेवक विजयी झाले.
- २०१७ : चार सदस्यीय प्रभाग पद्धत होती. अनिल देशमुख शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे होते. आघाडी झाली नाही. राष्ट्रवादी ११० जागांवर लढली. एकमेव नगरसेवक दुनेश्वर पेठे विजयी झाले.
गांधी, धवड, पाटील या अध्यक्षांनीही साथ सोडली
- नागपुरात राष्ट्रवादीची धुरा सोपविण्यात आलेल्या अध्यक्षांनीच पुढे साथ सोडल्याचा इतिहास आहे. गिरीश गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. पक्षाचे प्रशस्त कार्यालय उभारले. नंतर मात्र, त्यांनी स्वत:ला पक्षापासून दूर केले. माजी आ. अशोक धवड यांनीही अध्यक्षपद सांभाळल्यानंतर काँग्रेसचा हात धरला. तर अजय पाटील यांनीही अध्यक्षपद गेल्यानंतर राष्ट्रवादीचे घड्याळ सोडले. पुढे त्यांच्या पत्नी नगरसेविका प्रगती पाटील या भाजपकडून महापालिकेची नविडणूक लढल्या. अध्यक्ष राहिलेल्या नेत्यांनीच मध्ये साथ सोडल्याचा फटकाही राष्ट्रवादीला बसला.