अगोदर होणार कुलगुरूंची नियुक्ती?
By Admin | Updated: January 14, 2015 00:47 IST2015-01-14T00:47:56+5:302015-01-14T00:47:56+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन) आणि ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) या पदांच्या मुलाखती पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

अगोदर होणार कुलगुरूंची नियुक्ती?
‘सीओई’, ‘एफओ’ निवड नंतर होण्याची शक्यता : कायदेशीर सल्ला घेणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन) आणि ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) या पदांच्या मुलाखती पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. नियमांची तांत्रिक अडचण लक्षात घेता कुलगुरूपदाची निवड झाल्यानंतरच वरील पदांसाठी मुलाखती घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी कार्यव्यस्ततेमुळे कुलगुरूपदाचा प्रभार सोडल्यानंतर डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी देण्यात आली. आता कुलगुरूपदाच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यात नेमके कोण कोण उमेदवार राहणार हे स्पष्ट झाले नसले तरी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी या शर्यतीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
म्हणूनच प्रथम कुलगुरू नंतर ‘सीओई’,‘एफओ’ यांची निवड व्हावी, असा सूर निघत आहे. यासंदर्भात नियम तपासू व कायदेशीर सल्ला घेऊ, असे डॉ.गोमाशे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)