दयानंद पाईकराव
नागपूर : प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एसटी महामंडळाने चार वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीच्या सहकार्याने वायफाय यंत्रणा लावली होती. त्यामुळे प्रवाशांचे मनोरंजन होत होते. परंतु मागील चार वर्षांपासून ही यंत्रणाच गायब झाली आहे. त्यामुळे प्रवासात मनोरंजनासाठी पुन्हा वायफाय सुरु करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
एसटी महामंडळाने २०१६ मध्ये एका खासगी कंपनीच्या सहकार्याने राज्यातील १६ हजार बसेसमध्ये वायफाय यंत्रणा लावली होती. यातून एसटी महामंडळाला २.७५ कोटींचे उत्पन्नही मिळाले होते. खासगी कंपनीच्या जाहिरातीही या यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांना ऐकावयास मिळत होत्या. या यंत्रणेत एसटी महामंडळाने एकही रुपया खर्च केला नाही. परंतु संबंधित कंपनीला यापासून फारसा फायदा न झाल्यामुळे कंपनीने ही यंत्रणा बंद केली. सध्या एसटी बसमध्ये मनोरंजनासाठी कुठलीच सुविधा नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा वायफाय सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात राज्यभरात १७ हजार बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि अधिकाधिक प्रवासी एसटीकडे आकर्षित करण्यासाठी वायफाय सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
................
वायफाय गरजेचेच
वायफायची यंत्रणा एसटीच्या बसेसमध्ये बसविल्यानंतर एसटीच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली होती. प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती देऊन प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. वायफायची सुविधा दिल्यास एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने बसेसमध्ये वायफायची सुविधा देण्याची गरज आहे.
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)