समाजभान राखत पतीच्या अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार, तिघांना मिळाले नवे आयुष्य
By सुमेध वाघमार | Updated: November 26, 2023 19:45 IST2023-11-26T19:44:44+5:302023-11-26T19:45:37+5:30
काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील दशरथ महेश चकबेल (४६) असे अवयवदात्याचे नाव आहे. दशरथ चकबेल हे व्यवसायाने भाजी विक्रे ते होते.

समाजभान राखत पतीच्या अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार, तिघांना मिळाले नवे आयुष्य
नागपूर : दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानादेखील समाजभान राखत ब्रेनडेड पतीचे अवयवदान करण्याचा निर्णय पत्नीने घेतला. ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्याचा पत्नीने घेतलेल्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना नवे आयुष्य मिळाले.
काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील दशरथ महेश चकबेल (४६) असे अवयवदात्याचे नाव आहे. दशरथ चकबेल हे व्यवसायाने भाजी विक्रे ते होते. २१ नोव्हेंबर रोजी अचानक त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूमध्ये तीव्र स्वरुपातील रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी शथीर्चे प्रयत्न करून देखील उपचारास प्रतिसाद मिळाला नाही. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. उदित नारंग, डॉ. गुंजन घोडेश्वर, डॉ. वरिध कटियार या डॉक्टरांच्या पथकाने चकबेल यांची तपासणी करून मेंदू मृत घोषित केले.
चकबेल परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली. डॉ. सूचेता मेश्राम आणि त्यांच्या चमूने परिवाराचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्या दु:खातही त्यांच्या पत्नी शीला व मुलगा चंद्रशेखर चकबेल यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) याची माहिती देण्यात आली. ‘झेडटीसीसी’ने प्रतीक्षा यादी तपासून त्यानुसार गरजू रुग्णाला अवयवदान केले.