लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पश्चिम आफ्रिकेमधील माली येथील तुरुंगात बंद असलेल्या आजारी पतीच्या जामिनाकरिता ३.२५ कोटी रुपयांची रक्कम जमा केली जावी, यासाठी नागपूर येथील हतबल पत्नी गेल्या अकरा महिन्यांपासून दारोदार भटकंती करीत आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आदींना मदतीची मागणी केली आहे.
प्रियंका गुल्हाने, असे पत्नीचे नाव आहे. प्रियंका यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती नितीन सिव्हिल इंजिनिअर असून ते उत्तर प्रदेशातील नोएडा येथील मे. आर.एस. अॅक्सिओम कंपनीत उपमहाव्यवस्थापक आहेत. ही नवदुर्गा इलेक्ट्रॉनिक्स आणि सन सिटी एंटरप्रायझेस यांची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. या कंपनीने ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी आणि निरीक्षण करण्यासाठी त्यांची माली येथे नियुक्ती केली होती. दरम्यान, एनर्जी दु माली या संस्थेने बँक हमीच्या वैधतेवर आक्षेप घेऊन कंपनीविरोधात लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर संस्थेने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी बमाको येथे नितीन यांना ताब्यात घेऊन तुरुंगात टाकले. १५ ऑगस्ट २०२५ रोजी मालीतील न्यायालयाने त्यांना ३.२५ कोटी रुपये जमा करण्याच्या अटीवर जामीन दिला आहे; परंतु कंपनीने ही रक्कम अद्याप जमा केली नाही. कंपनी केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे, असा आरोप प्रियंका यांनी केला.
संपूर्ण जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची
बँक हमीची वैधता सुनिश्चित करण्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. त्यासोबत नितीन यांचा काहीच संबंध नाही. हे संपूर्ण प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयांमुळे आणि तांत्रिक चुकीमुळे उद्भवले, असे प्रियंका यांचे म्हणणे आहे.
जिवाला गंभीर धोका निर्माण झालाय
नितीन यांना हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे. तुरुंगात अपुरी वैद्यकीय सुविधा असल्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. त्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असेही प्रियंका यांनी भावुक होऊन सांगितले.
Web Summary : Nagpur woman seeks government help to free her husband, a civil engineer jailed in Mali, West Africa. He needs ₹3.25 crore for bail. The company is delaying, and his health is deteriorating in prison.
Web Summary : नागपुर की एक महिला पश्चिमी अफ्रीका के माली में कैद अपने पति को छुड़ाने के लिए सरकार से मदद मांग रही है। जमानत के लिए 3.25 करोड़ रुपये की जरूरत है। कंपनी देरी कर रही है, और जेल में उसके पति की हालत बिगड़ रही है।