आरोपी पतीची कबुली : २५ पर्यंत पोलीस कोठडीखापरखेडा : पत्नीने आपला विश्वासघात केल्याने तिची व तिच्या प्रियकराची हत्या केल्याची कबुली सोनाली व जॉनच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोनालीचा पती अमरराज याने खापरखेडा पोलिसांना दिली. त्याला रविवारी (दि. १५) रात्री कामठी रेल्वेस्थानक परिसरात अटक करण्यात आली असून, सोमवारी (दि. १६) सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गायकवाड यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १० दिवसांची अर्थात बुधवारपर्यंत (दि. २५) पोलीस कोठडी सुनावली. अमरराज जंगलू मेश्राम (३५, रा. वलनी, ता. सावनेर) असे आरोपी पतीचे तर सोनाली अमरराज मेश्राम (२५) व जॉन ऊर्फ कमलेश सिंग (३५) अशी मृतांची नावे आहेत. अमरराजने सोनालीसोबत प्रेमविवाह केला होता. हे त्याचे दुसरे लग्न होते. जॉन हा मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असून, तो सोनालीचे वडील गंगाधर वाघपैजण, रा. गिट्टीखदान, नागपूर यांच्याकडे किरायाने राहायचा. त्यामुळे सोनाली व जॉन यांची ओळख होती. अमरराजच्या वडिलांनी त्याला वलनी येथील घरी येण्यास मनाई केल्याने तसेच सोनाली वलनी येथे राहण्यास तयार नसल्याने तो तिच्या वडिलांच्या घरी राहायचा. या घटनेसंदर्भात अमरराजने पोलिसांना सांगितले की, सोनालीचे जॉनसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब आपल्याला कळल्यानंतर तिला समजावून सांगत जॉनशी असलेले संबंध कायमचे तोडण्याची अनेकदा सूचना केली होती. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. जॉन व अमरराज दोघेही एकाच घरी राहात असल्याने अनैतिक संबंधाचे पुरावे मिळत नसल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, आपण या दोघांची चित्रफित तयार केली. त्यानंतर दोघांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (दि. ९) गिट्टीखदान परिसरातील दारूच्या दुकानात जॉन दारू पित बसला असल्याचे आढळून आले. महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून त्याला दुचाकीवर बसवून बखारीकडे नेले. जाताना कोराडी परिसरात दोघेही दारू प्यायलो. वलनी फाट्यावर जॉन दुचाकीवरून पडला. परिसरात कुणीही नसल्याचे पाहून दगडाने त्याच्या डोक्यावर वार करीत त्याची हत्या केली आणि मृतदेह कालव्यात टाकून घर गाठले, असेही त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी नातेवाईकाकडे जायचे असल्याचे सांगून सोनालीला दुचाकीने बखारी शिवारात नेले. तिथे तिला जॉनशी असलेल्या संबंधाबाबत विचारणा केली. तिने नकार देताच चित्रफित दाखविली. रागाच्या भरात साडीने तिचा गळा आवळला व नंतर ब्लेडने तिच्या डाव्या हाताची नस कापली. यात तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच भंडाऱ्याकडे पळ काढल्याचे त्याने सांगितले. (प्रतिनिधी) आत्महत्या करण्याची बतावणीवलनी व बखारी शिवारात मृतदेह आढळल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होताच अमरराजच्या लहान भावाला शंका आली. त्याने अमरराजच्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा त्याने आपण आत्महत्या करणार असल्याची बतावणी त्याने लहान भावाकडे केली. लहान भावाने समजूत काढल्यानंतर त्याच्या सूचनेनुसार अमरराज रविवारी (दि. १५) भंडाऱ्याहून वलनी येथे घरी यायला निघाला. त्यातच खापरखेडा पोलिसांचे पथक त्याच्या शोधात भंडाऱ्याला गेले होते. तो कामठी परिसरात असल्याचे कळताच त्याला रविवारी रात्री कामठी रेल्वेस्थानक परिसरात अटक केली.
विश्वासघात केल्याने पत्नी व प्रियकराची केली हत्या
By admin | Updated: January 17, 2017 02:02 IST