बाजारगाव येथे कोविड चाचणी केंद्र का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:20+5:302021-04-06T04:08:20+5:30
बाजारगाव : नागपूर-अमरावती मार्गावर बाजारगाव हे बाजारपेठेचे गाव आहे. सोबतच या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे या ...

बाजारगाव येथे कोविड चाचणी केंद्र का नाही?
बाजारगाव : नागपूर-अमरावती मार्गावर बाजारगाव हे बाजारपेठेचे गाव आहे. सोबतच या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी रोज कामगारांची वर्दळ असते. या परिसरात गत दोन महिन्यात संक्रमणाचे प्रमाण अधिक वाढले आहे. मात्र बाजारगाव येथे कोविड चाचणी केंद्र नसल्याने या परिसरातील २० हून अधिक गावांतील नागरिकांना चाचणीसाठी वाडी आणि कोंढाळी येथे जावे लागते. इकडे चाचणी केंद्र नसल्याने या परिसरात रुग्ण ट्रेसिंगचे प्रमाण फार कमी आहे. सध्या नागपूर ग्रामीण तालुक्यात कोरोनाचे संक्रमण अधिक आहे. या तालुक्यात आतापर्यंत ७४०८ नागरिक बाधित झाले आहे तर १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या तालुक्यात दिवसाकाठी सरासरी १८८ नागरिक संक्रमित होत आहेत. यात बाजारगाव आणि नजीकच्या गावातील रुग्णांचा समावेश आहे. बाजारगाव येथे कोविड चाचणी केंद्र झाल्यास सातनवरी, शिवा, सावंगा, डिगहोड पांडे, देवळी काळबांडे, गिदमगड, अडेगाव, रिंगणाबोडी, कातलाबोडी, पांजरा, धामणा लिंगा आणि नजीकच्या गावातील नागरिकांना त्याचा अधिक फायदा होईल. प्रशासनाचा रुग्ण ट्रेस करण्यावर अधिक भर आहे. मात्र कोविड चाचणी केंद्र लांब असल्याने ग्रामस्थ वाडी आणि कोंढाळी येथे जाण्यास टाळाटाळ करतात. चाचण्या कमी होत असल्याने ग्रामीण भागात मृत्यूदर वाढतोय, हे वास्तव आहे. यासोबतच कोविड संशयित रुग्ण चाचणी न करता गावात मुक्त संचार करीत असल्याने संक्रमणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे रुग्ण ट्रेस करण्यासाठी बाजारगाव येथे तातडीने कोविड चाचणी केंद्र सुरू करावे अशी मागणी बाजारगावचे सरपंच तुषार चौधरी, शिवाच्या सरपंच रेखा गावंडे, सातनवरीचे सरपंच विजय चौधरी आणि सावंगाचे सरपंच प्रवीण पानपत्ते यांनी केली आहे.
लसीकरणावर भर आवश्यक
ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अद्यापही ग्रामस्थ उत्सुक दिसत नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे, हे ग्रामस्थांना पटवून देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे गावागावात लसीकरणाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. यासोबतच गावागावात कोविड लसीकरणाबाबत कॅम्प लागणे आवश्यक आहे. यासाठी सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सेविका यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.