तुमची वेतनवाढ का रोखू नये?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST2021-05-24T04:07:25+5:302021-05-24T04:07:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्ततः फेकून देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला शो कॉज नोटीस बजावण्यात ...

तुमची वेतनवाढ का रोखू नये?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्ततः फेकून देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला शो कॉज नोटीस बजावण्यात आली असून, ‘तुमची दोन वर्षांची वेतन वाढ का रोखण्यात येऊ नये,’ अशी विचारणा करण्यात आली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात रस्त्यावर भाजीचे दुकान लावून बसणाऱ्या एका महिलेला वारंवार सूचना देऊनही तिने आपले भाजीचे दुकान तेथून हटविले नाही. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी रागाच्या भरात महिलेच्या दुकानातील भाजी रस्त्यावर इतस्ततः फेकली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. ‘लोकमत’ने या संबंधाने वृत्त प्रकाशित करताच पोलीस आयुक्तालयातून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, खांडेकर यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. त्यांना ‘शो कॉज’ नोटीस बजावण्यात आला आहे. या अशोभनीय वर्तनाबद्दल जाब विचारतानाच तुमची दोन वर्षांची वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, अशीही विचारणा करण्यात आली आहे. समाधानकारक खुलासा मिळाला नाही तर खांडेकर यांच्यावर कारवाई होऊ शकते.
---