नवीन डीजीपी काेण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:15+5:302021-01-02T04:08:15+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे मावळते पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे महाराष्ट्राच्या ...

नवीन डीजीपी काेण?
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे मावळते पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. सेवाज्येष्ठतेच्या क्रमाने संजय पांडे, परमवीर सिंग, हेमंत नगराळे आणि रजनीश सेठ ही चार नावे पोलीस महासंचालकाच्या पदासाठी पात्र आहेत. तथापि, एकूणच वातावरण आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगराळे किंवा रजनीश सेठ यांची राज्याचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, अशी खास सूत्रांची माहिती आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे महासंचालक जयस्वाल यांचे सरकारशी फारसे सख्य नव्हते. त्यामुळे ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार, अशी सहा-आठ महिन्यांपासूनच चर्चा होती. अखेर झालेही तसेच. जयस्वाल यांची बुधवारी सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती घोषित झाली. त्यामुळे आता राज्य पोलीस दलाची धुरा कुणाच्या हाती सोपविली जाणार, हा विषय अवघ्या सुरक्षा यंत्रणांची उत्सुकता टोकाला पोहचविणारा ठरला आहे. त्यासंबंधाने राजकीय वर्तुळातही चर्चावजा उत्सुकता आहे. सेवाज्येष्ठतेचा निकष लक्षात घेतल्यास सर्वात पहिले नाव संजय पांडे यांचे आहे. ते जून २०२२ मध्ये निवृत्त होतील. दुसरे नाव बिपीन बिहारी यांचे आहे. मात्र, ते जानेवारी २०२१ मध्ये निवृत्त होत असल्याने त्यांची डीजीपी म्हणून वर्णी लागणे शक्य नाही. हीच बाब सुरेंद्र पांडे यांच्या बाबतीतही बोलली जाते.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग जून २०२२ मध्ये निवृत्त होतील. ऑक्टोबर २०२२ मध्ये निवृत्ती असलेले हेमंत नगराळे (डीजी टेक्निकल) तसेच डिसेंबर २०२३ पर्यंतची पारी हातात असलेले रजनीश सेठ (डीजी एसीबी) हे दोन अधिकारी सध्या डीजीपीच्या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत.
मायनस-प्लस पॉईंट
वेगवेगळ्या कारणांमुळे संजय पांडे सरकारच्या गुड बुकमध्ये नसल्याची शीर्षस्थ स्तरावर चर्चा आहे. डीजीपीचे दावेदार म्हणून पहिल्या स्थानी असलेले डॉ. परमवीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्तासारखे अत्यंत प्रतिष्ठेचे पद सोडण्याची शक्यता कमी असल्याचा ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सूर आहे. त्यामुळे हेमंत नगराळे आणि रजनीश सेठ यांचे नाव अग्रस्थानी येते. कोणतीही स्थिती हाताळण्याचे कसब असलेले अधिकारी म्हणून नगराळे यांच्याकडे बघितले जाते. तर, रजनीश सेठ हे पोलीस दलातील निर्विवाद प्रतिमेचे अधिकारी समजले जातात. तुलनेत नगराळे यांच्यापेक्षा ११ महिन्यांचा कालावधी सेठ यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे यावेळी नगराळे यांनाच संधी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जाते.