लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण १३ जुलै रोजी होणार होते. तसा प्रस्ताव दंत संचालनालयाला पाठवण्यात आला होता.
मात्र, अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांची बदली झाल्याने लोकार्पण टळल्याचे वरवरचे कारण सांगितले जात असले, तरी खरे कारण वेगळेच असल्याचे समोर आले आहे. या हॉस्पिटलचे बांधकाम सात वर्षे होऊनही अद्यापही पूर्ण झालेले नाही आणि कोट्यवधी रुपयांच्या यंत्रसामग्रीच्या खरेदीला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही, हेच लोकार्पण लांबण्याचे मुख्य कारण असल्याचे पुढे आले आहे.
नागपूरचे महाविद्यालय शासकीय दंत व रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनांतर्गत दंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला १३ एप्रिल २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ४ जानेवारी २०१९ रोजी डेंटलच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या हॉस्पिटलच्या कोनशिलेचे अनावरण झाले. यामुळे हे रुग्णालय मुदतीत पूर्ण होऊन रुग्णसेवेत येईल अशी अपेक्षा होती. परंतु, सात वर्षे होऊनही बांधकाम पूर्ण झालेले नाही, ही बाब चिंतेची आहे.
यंत्रसामग्री खरेदीला निधी मिळेनाबांधकाम अपूर्ण असण्यासोबतच, आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदीलाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सूत्रांनुसार, जिल्हा नियोजन समितीमधून 'सुपर'मधील यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी जवळपास ८ कोटी २५ लाखांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. परंतु, यंत्रसामग्रीची अंदाजित किंमत आणि प्रत्यक्षातील किंमत यात तफावत असल्याने हा निधी मिळालेला नाही, अशी माहिती आहे. यामुळे, जरी इमारत उभी राहिली तरी आतमध्ये अत्याधुनिक सुविधांअभावी रुग्णसेवेला सुरुवात करणे शक्य नाही.
प्रभारी अधिष्ठातांकडून सद्यस्थितीची माहिती
- याबाबत प्रभारी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांना विचारले असता, त्यांनी सद्यःस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, तत्कालीन अधिष्ठाता यांनी १३ जुलै रोजी लोकार्पण करण्याचा प्रस्ताव संचालनालयाला पाठवला होता.
- त्या संदर्भात संचालनालयाने 3 काही प्रश्न उपस्थित केले. शिवाय, बांधकाम विभागाकडून काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. यंत्रसामग्रीलाही मंजुरी मिळालेली नाही.
- त्यामुळे सध्या तरी लोकार्पण 3 होणार नाही. मात्र, एक सकारात्मक बाब म्हणजे, संचालनालयाने हॉस्पिटलच्या नामांकरणाला मंजुरी दिली आहे.