पटोलेंच्या बैठकांना राऊत दांडी का मारतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:10 IST2021-08-22T04:10:09+5:302021-08-22T04:10:09+5:30
कमलेश वानखेडे - हायकमांडशी थेट संपर्क असलेल्या नेत्यांमध्येच मतभेद : दिल्लीतूनच खतपाणी घातले जात असल्याची चर्चा नागपूर : काँग्रेससाठी ...

पटोलेंच्या बैठकांना राऊत दांडी का मारतात?
कमलेश वानखेडे
- हायकमांडशी थेट संपर्क असलेल्या नेत्यांमध्येच मतभेद : दिल्लीतूनच खतपाणी घातले जात असल्याची चर्चा
नागपूर : काँग्रेससाठी गटबाजी नवी नाही. त्यातही नागपुरातील गटबाजीपुढे तर दिल्लीतील हायकमांडनेही हात टेकल्याचे पाहायला मिळाले आहे. पण, आता मात्र हायकमांडशी थेट संपर्कात असलेल्या दोन नेत्यांमध्येच जोरात रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलाविलेल्या पक्षाच्या कोणत्याही बैठकीला राऊत उपस्थित राहत नाहीत. पटोलेंना डिवचण्याची एकही संधी राऊत सोडताना दिसत नाहीत. अशात प्रदेश अध्यक्षपद देऊन ‘वाघ’ बनविलेल्या पटोलेंचे दात काढून घेण्याचा प्रयत्न दिल्लीतूनच तर होत नाही ना, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात पिकू लागली आहे.
गेल्या महिन्यात नाना पटोले यांनी नागपूर महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तीन विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतली. प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमपत्रिकेत राऊत यांचे नावही होते. पण, राऊत नागपुरात असतानाही बैठकीत फिरकले नाहीत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात ‘जरा याद करो कुर्बानी’ कार्यक्रम झाला. या वेळीही राऊतांनी दांडी मारली. कार्यक्रमानंतर राऊतांच्या अनुपस्थितीबाबत पटोलेंना विचारणा केली असता ‘त्यांना गेल्या वेळीपेक्षा अधिक बरं नाही,’ अशी खोचक प्रतिक्रिया पटोले यांनी दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांच्याकडून पक्षाच्या कार्यक्रमांना मारली जाणारी दांडी हायकमांडच्या रेकॉर्डवर आणण्याची तयारी पटोले यांनी चालविली आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी राऊत यांचे नाव चर्चेत होते. मात्र, पटोलेंच्या महत्त्वाकांक्षेमुळे राऊतांचा पत्ता कटला. आता राऊत यांच्या ऊर्जामंत्री पदावरही पटोले यांचा डोळा आहे, असा राऊत समर्थकांचा आक्षेप आहे. एवढेच नव्हेतर, एकेकाळी राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून बसणारे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या नागपूरचे पालकमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेमागे पटोलेंचाच हात आहे, असा दावाही राऊत समर्थक करीत आहेत. पटोले हे नागपुरात राऊतविरोधी गटाला खतपाणी घालून मजबूत करीत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीतही पटोले हे मुत्तेमवार-ठाकरे गटालाच झुकते माप देतील, अशी भीती राऊत समर्थकांना आहे. या कारणांमुळे राऊत यांनी पटोलेंविरोधात ताठर भूमिका घेतली असल्याचे राऊत समर्थकांचे म्हणणे आहे.
असे आहेत आक्षेप
- पटोले नागपुरातून लोकसभा लढले तेव्हा राऊत मनाने सोबत नव्हते, असा पटोले समर्थकांचा आरोप आहे.
- पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राऊत समर्थकांना डावलणे सुरू आहे, असा राऊत समर्थकांचा रोष आहे.
किसमे कितना दम
- पटोले हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असले तरी राऊत हे अ.भा. अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
- पटोले यांची ओबीसी नेते म्हणून इमेज आहे तर राऊत यांच्याकडे दलित समाजाचे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
- पटोले काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. राऊत यांनी एकदाही पक्ष सोडलेला नाही.
- ज्येष्ठ कोण, यावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे.