वास घेतल्यानंतर मांजरी विचित्र चेहरा का करतात?
By निशांत वानखेडे | Updated: March 3, 2025 11:06 IST2025-03-03T11:04:58+5:302025-03-03T11:06:01+5:30
Nagpur : मांजरीमध्ये वेगळे काय?

Why do cats make weird faces after smelling?
निशांत वानखेडे
नागपूर : मांजर हा प्राणी तसा हिंसक प्रजातीचा पण माणसांसोबत त्यांचे संबंध जुळण्याला आता हजारो वर्षे होत आहेत. कदाचित श्वान आणि गायी म्हशीनंतर माणसांच्या जवळ आलेला हा प्राणी; पण श्वान किंवा इतर प्राण्यांची वागणूक बऱ्यापैकी आकलनात येणारी असली तरी मांजरींचे वागणे अद्यापही गूढ असल्यासारखे आहे. उंचावरून पडल्यानंतर ते जमिनीवर पायानेच टेकते, यावर शास्त्रज्ञांचे मंथन चालले असताना त्यांचे आणखी एक वागणे कुतूहल निर्माण करणारे आहे. शिंकताना किंवा एखादा वेगळा वास घेताना मांजरी विचित्र चेहरा का करतात, हा संशोधकांचा सध्याचा संशोधनाचा विषय, माणसांप्रमाणे दुर्गंधी आल्यावर त्या त्रासिक चेहरा किंवा नाक मुरडतात का, असे आधी समजले जायचे. मात्र, अभ्यासातून वातावरणातील रासायनिक सिग्नल ओळखण्यासाठीच त्या विचित्र चेहरा करतात, असे लक्षात आले आहे.
प्राण्यांमधील फेरोमोन्स काय असते?
जंगली आणि पाळीव मांजरीसह अनेक प्राणी तोंडावाटे 'फेरोमोन्स' नामक रसायन सोडतात. हा त्यांच्या सजातीय प्रजातीच्या संवादाचा अदृश्य रासायनिक सिग्नल असतो. मांजरींमध्ये हे रसायन कसे काम करते हे शोधण्यासाठी संशोधकांनी मांजराच्या वर्तनाचा अभ्यास केला.
मांजरीमध्ये वेगळे काय?
मांजरीमध्ये तोंडाच्या वरच्या भागात 'व्होमेरोनसल' या संवेदी अवयव असतो. हा अवयव नाकाच्या श्वसन तंत्रापासून वेगळा असतो. मांजरीचा फेरोमोन्सशी सामना होतो, तेव्हा त्या गंध घेण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हालचाल करतात. मांजरी त्यांचे तोंड हलके उघडतात, ओठ मागे वळवितात. यामुळे फेरोमोन्सचे घटक व्होमेरोनसल अवयवांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे महत्त्वाचे रासायनिक संकेत जाणण्याची मांजरीची क्षमता वाढते. या विचित्र वर्तनात भावनिक कारण नसते, तर फेरोमोन्स शोधून त्यावर प्रतिक्रिया देत असते.
फेरोमोन्सची प्रक्रिया व मांजरींची प्रतिक्रिया
- जेव्हा मांजरी त्यांचे चेहरे फर्निचर, स्क्रैच पृष्ठभागांवर घासतात, लघवीची फवारणी करतात किंवा मलविसर्जन करतात तेव्हा ते इतर मांजरींसाठी रासायनिक संदेश सोडतात. इतर मांजरी त्यांच्या व्होमेरोनसल अवयवाचा वापर करून या सुगंधाच्या खुणांचे विश्लेषण करतात आणि त्यांच्या शेजाऱ्यांबद्दल माहिती गोळा करतात.
- फेरोमोन रेणू चाटल्याने किंवा श्वसनाद्वारे मांजरीच्या तोंडात प्रवेश करतात आणि लाळेमध्ये विरघळतात. त्यानंतर ते तोंडाच्या वर नासोपॅलाटिन नलिकांवाटे प्रवास करीत व्होमेरोनासल अवयवापर्यंत पोहचतात. फेरोमोन रेणू व्होमेरोनासल अवयवापर्यंत पोहोचल्यानंतर मेंदूमधील हायपोथालेमसच्या एमिगडालामध्ये प्रवास करतो. हा मेंदूचा विशिष्ट भाग आहे, जेथे लैंगिक, आहारविषयक आणि सामाजिक वर्तन नियंत्रित होते.
श्वान आणि मांजर
कुत्रे त्यांच्या तीव्र वासाच्या जाणिवेसाठी प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या अनुनासिक मार्गात असते. व्होमेरोनसल अवयवामुळे मांजरींमध्ये कुत्र्यांपेक्षा तिप्पट वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध शोधण्याची क्षमता असते. हे अवयव त्यांच्यासाठी शक्तिशाली साधन आहे, जे वातावरणातील महत्त्वाच्या सामाजिक माहितीचे स्पष्टीकरण करण्यास सक्षम करते. मांजरी गूढ असतात त्या अशा.
फेरोमोन्स कुठे तयार होते, कशासाठी वापरतात?
मांजरी इतर प्राण्यांप्रमाणे विविध संदेश पोहोचविण्यासाठी फेरोमोन्सचा वापर करतात. हनुवटी, गाल, डोळे आणि कान यांच्यातील जागा, ओठांच्या कडा, शेपटीचा भाग, गुप्तांग आणि गुदद्वाराभोवती, पंजे आणि शरीराच्या अनेक भागांत असलेल्या विशेष ग्रंथींद्वारे फेरोमोन्स स्राव होतो. ते त्यांचे क्षेत्र चिन्हांकित करण्यासाठी असू शकते. मांजर व पिलांचे संबंध मजबूत करण्यासाठी असू शकते. यासह मांजरींच्या लैंगिक स्थितीबद्दल सुचविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.