- But why come to Vidarbha? This year winter session only for six days | -तर विदर्भात येताच कशाला ? : यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस !
-तर विदर्भात येताच कशाला ? : यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस !

ठळक मुद्देहा तर केवळ औपचारिकतेचा ‘फार्स’ विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणार कसा ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील सहा दशकांपासून उपेक्षित असलेल्या विदर्भाला कधीतरी ‘अच्छे दिन’ येतील व ‘मायबाप सरकार’ येथील जनता व शेतकऱ्यांना न्याय देईल, अशी अपेक्षा दर हिवाळी अधिवेशनात व्यक्त होते. परंतु दरवेळी वैदर्भीयांच्या पदरी निराशाच येते. नागपूर कराराला हरताळ फासत अधिवेशनाचा कालावधी दोन किंवा जास्तीत जास्त तीन आठवडे इतकाच राहतो. त्यामुळे यात विधायक बाबींवर चर्चेसाठी पुरेसा वेळच मिळत नाही. महाविकासआघाडीच्या शासनकाळातील पहिले अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. याचा कालावधी सहा दिवसाचाच राहण्याची दाट शक्यता आहे. अवघ्या सहा दिवसात सभागृहाचे कामकाज होणार तरी किती आणि विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणार तरी किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ सहा दिवसासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन जर जनतेच्या पदरी काहीच आश्वासक पडत नसेल तर मग विदर्भात येताच कशाला, केवळ सहलीसाठीच का, असा प्रश्न वैदर्भीयांनी उपस्थित केला आहे. अधिवेशनातील औपचारिकतेचा ‘फार्स’ असेच याला म्हणावे का, असा सवालही केला जात आहे.
१९५३ साली विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारानुसार उपराजधानीत वर्षातून एक अधिवेशन घेणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन महिनाभराचे तरी असले पाहिजे. मात्र सुरुवातीच्या काळापासून सर्वच शासनकर्त्यांनी हिवाळी अधिवेशनाला फारसे गंभीरतेने घेतलेच नाही. गुलाबी थंडीत दोन आठवड्यांची ‘पिकनिक’ अन् हुरडा पार्टी असेच स्वरुप याला आले. दरवर्षी हिवाळ्यात नागपुरात अख्खे मंत्रालय येते. सचिवालयाचे कामकाज सुरू होण्यापासून ते अगदी ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या येण्यापर्यंत नागपुरात अधिवेशनाची धूम असते. परंतु मागील काही वर्षांत एकदाही अधिवेशनाचे कामकाज २० दिवसाहून अधिक काळ झाले नाही. त्यातही विविध मुद्यांवरुन होणाऱ्या गोंधळात दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेकदा तहकूब होते. अशा स्थितीत मूळ मुद्यांवर चर्चाच होत नाही.
हिंमत असेल तर करा नागपूर कराराचे पालन
नागपूर करारानुसार अधिवेशन हे सहा आठवड्यांचे व्हावे असे ठरले होते. पहिले हिवाळी अधिवेशन तर १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर १९६० इतक्या काळासाठी चालले होते. नंतर त्याचा कालावधी कमी होत गेला. दुसरा आठवडा संपून तिसऱ्या आठवड्यात कामकाज व्हावे, अशी ना सत्ताधारी ना विरोधकांची इच्छा असते. हिवाळी अधिवेशन म्हणजे वैदर्भीयांचा पाहुणचार अशी विशेषणे वापरली जातात. परंतु पाहुणचारासाठी सहा दिवसांचा कालावधी पुरेसा पडत नाही. मग कामकाजाला हा वेळ कसा काय पर्याप्त राहणार आहे. त्यामुळेच हिंमत असेल तर नव्या सरकारने नागपूर कराराचे पालन करून एक नवा पायंडा पाडला पाहिजे.
नागपुरात आजवर झालेली अधिवेशने व कामकाजाचे दिवस
१९६० (२७ दिवस), १९६१ (२५ दिवस ), १९६४ (२३ दिवस )
१९६५ ( १५ दिवस ), १९६६ (२४ दिवस), १९६७ (१७ दिवस) , १९६८ (२८ दिवस) , १९६९ (२४ दिवस), १९७० ( १८ दिवस), १९७१ (२६ दिवस), १९७२ (२० दिवस) , १९७३ (२५ दिवस), १९७४ (२५ दिवस), १९७५ (१७ दिवस), १९७६ (१५ दिवस), १९७७ (१४ दिवस), १९७८ (१४ दिवस), १९८० (९ दिवस) १९८१ (१५ दिवस), १९८२ (१० दिवस), १९८३ (१५ दिवस), १९८४ (६ दिवस), १९८६ (१५ दिवस), १९८७ (१५ दिवस), १९८८ (१५ दिवस), १९८९ (५ दिवस) , १९९० (१४ दिवस) , १९९१ (१४ दिवस), १९९२ (६ दिवस), १९९३ (१४ दिवस), १९९४ (८ दिवस), १९९५ (१४ दिवस), १९९६ (१० दिवस), १९९७ (८ दिवस), १९९८ (१२ दिवस), १९९९ (१० दिवस), २००० (१५ दिवस), २००१ (१० दिवस), २००२ (८ दिवस), २००३ ( १० दिवस), २००४ (११ दिवस), २००५ (१० दिवस), २००६ ( १० दिवस), २००७ ( ११ दिवस), २००८ (१२ दिवस),२००९ (१० दिवस), २०१० (१२ दिवस), २०११ (११ दिवस), २०१२ (१० दिवस), २०१३ (१० दिवस), २०१४ (१३ दिवस), २०१५ (१३ दिवस), २०१६ (१० दिवस), २०१७ (१० दिवस), २०१८ (एकमेव पावसाळी अधिवेशन -१३ दिवस)
सचिवालय सोमवारपासून नागपुरात
हिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शुक्रवारी जवळपास ५०० कर्मचारी दाखल झाले. उद्या व परवा अधिकारीही दाखल होतील. येत्या सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरु होईल.
हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरु आहे. सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयातील सुरक्षारक्षक विधानभवनाचा ताबा घेतील. सचिवालयाच्या कामकाजाला सुरूवात होईल. विधानसभा अध्यक्षांकडून हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाल्यापासून येथील स्थानिक प्रशासनाच्या कामालाही गती आली आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी तयारी व सुरक्षेचा आढावाही घेतला. सोमवारी ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर व उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून विधिमंडळ अधिवेशनाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहेत.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुंबईहून विधिमंडळ सचिवालयातील बहुतांश कर्मचारी नागपुरात पोहोचले. त्यांच्यासह महत्त्वाची विविध कागदपत्रे, फायलीही ट्रकच्या माध्यमातून पोहचले असून, विधिमंडळात फाईली, कागदपत्रे लावणे सुरू करण्यात आली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसात संपूर्ण कामे आटोपली जातील आणि सोमवारपासून सचिवालयाच्या कामाला सुरुवात होईल.
विधिमंडळातील अधिकारी उद्या घेणार आढावा
हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी हे येत्या रविवारी, ८ तारखेला नागपुरात येणार असल्याची माहिती आहे. नागपुरातील अधिकारी हे मुंबईतील विधिमंडळ सचिवालयतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच ७ तारखेपर्यंत सर्व कामे आटोपण्यासाठी सर्व कामाला लागले आहेत.

Web Title: - But why come to Vidarbha? This year winter session only for six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.