का बदलतेय ऋतुचक्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:10 AM2019-12-30T11:10:24+5:302019-12-30T12:25:07+5:30

हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंगवगैरे गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत. मात्र या गोष्टींशी आपला काय संबंध, असा विचार तुम्ही करीत असाल तर ते चूक ठरेल.

Why the climate cycle changing? | का बदलतेय ऋतुचक्र?

का बदलतेय ऋतुचक्र?

Next
ठळक मुद्देअति थंडी, उन्हाचे चटके, पावसातही बदल

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंगवगैरे गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत. मात्र या गोष्टींशी आपला काय संबंध, असा विचार तुम्ही करीत असाल तर ते चूक ठरेल. गेल्या काही वर्षांत हवामानामध्ये सातत्याने होत असलेले बदल या धोक्याकडे इशारा करणारे आहेत. तापमानात होणारी प्रचंड वाढ, हिवाळ्यात अति अधिक वाटणारा गारठा आणि पावसाच्या पॅटर्नमध्ये दिसून येणारा बदल सामान्य नागरिकांनी अनुभवला आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, हा बदल एका सीझनपुरता वाटत असला तरी अनेक वर्षांपासून होणाऱ्या बदलांचे ते परिणाम आहेत आणि ते चिंता वाढविणारे आहेत.
यावर्षी अनेक प्रकारचे बदल नागपूरकरांनी अनुभवले. हवामान बदलाचे अभ्यासक व सध्या लंडनमध्ये यावर संशोधन करणारे अक्षय देवरस यांनी या बदलाकडे लक्ष वेधले. आपल्या देशात हवामानानुसार तीन ऋतू मानले जातात. मात्र या ऋतूंमध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने बदल होत आहे. यावर्षी उन्हाचे चटके नागरिकांना चांगलेच जाणवले. तापमान ४९ अंशावर पोहचले होते आणि उन्हाळ्याचा कालावधीही वाढल्याचे दिसून आले. नागपूर व विदर्भात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पावसाळ्यातही प्रचंड अनियमितता दिसून आली. जून महिना हा पावसाळा सुरू होण्याचा कालावधी असतो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र यावर्षी सुरुवात झाल्यानंतर अचानक पाऊस गायब झाला. जुलै महिन्यापर्यंत उन्हाळा की पावसाळा हेच कळेनासे झाले होते. त्यानंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली, परंतु त्यामुळे नुकसानच सहन करावे लागले. आॅक्टोबर महिन्यात साधारणत: थंडीला सुरुवात होते, मात्र हा संपूर्ण महिना पावसातच गेला. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात पुराचे थैमान महाराष्टÑाने अनुभवले आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने हा प्रकार झाला. थंडीच्या परिस्थितीतही अनियमितता दिसून येत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात थंडीची चाहूल लागल्याचे जाणवले. मात्र यावेळी कधीही न पाहिलेले चित्र दिसून येत असल्याचे देवरस यांनी सांगितले. २५ डिसेंबरला ढगाळ वातावरण होते आणि २६ ला पावसाने हजेरी लावली. या काळात कधीकधी पाऊस यायचा, पण यावर्षीचा अनुभव वेगळा आहे. एकतर या प्रमाणात पाऊस कधीच पडला नाही. त्याचे होणारे परिणाम दुसºयाच दिवशी दिसून आले आणि अचानक ८ ते १० अंशाने पारा घसरला व ५ अंशापर्यंत पोहचला व त्यामुळे प्रचंड थंडी जाणवायला लागली आहे.
मात्र अक्षय देवरस यांच्या मते, एका सीझनमध्ये दिसणाºया बदलांना थेट ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट स्ट्राईकशी जोडता येणार नाही. हे बदल १५-२०-३० वर्षांच्या अभ्यासाने समजले जाऊ शकतात. त्यामुळे सध्या दिसून येणारे बदल त्याची परिणीती असू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र गेल्या काही वर्षांत प्रत्येक ऋतूमध्ये अतिपणा दिसून येत आहे. अतिथंडी, अतितापमान आणि पावसाळ्याचा बदललेला पॅटर्न चिंताजनक भविष्याकडे नेणारा नक्कीच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतीला प्रचंड फटका, आरोग्याचीही समस्या
हवामान बदलाचे तज्ज्ञ डॉ. चलपती राव यांनी, हवामानात होणारा हा बदल नक्कीच क्लायमेट स्ट्राईकशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. मुंबई, दिल्लीसह जगभरात याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. पावसाच्या बदलत्या पॅटर्नमुळे शेती करण्यावरच संभ्रम निर्माण झाला आहे. आधी ठराविक काळात शेतीत पेरणी किंवा इतर मशागत सुरू व्हायची. मात्र त्यात अनियमितता आली आहे. यावर्षी अवेळी पडलेल्या पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. हिवाळ्यातही ढगाळ वातावरणामुळे शेतातील पिकांवर परिणाम होत असून, किडी व रोगट पिकांची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे मानवी आरोग्यावरही त्याचे परिणाम होत आहेत. सर्दी, खोकला, दमा हे आजार नियमित झाले असून, नवीन आजारांचाही विळखा वाढत असल्याचे डॉ. राव यांनी सांगितले.
हे जलवायू परिवर्तनच : चटर्जी
ग्रीन व्हिजिलचे कौस्तुभ चटर्जी यांच्या मते, हवामानात दिसून येणारे बदल हे जलवायू परिवर्तनाचाच भाग आहेत व प्रचंड चिंतेचे कारण आहेत. कधी प्रचंड पाऊस तर कधी काहीच नाही, उन्हाळाही वाढताना दिसतो. आधुनिक जीवनशैलीमुळे प्रचंड प्रमाणात होणारे कॉर्बन उत्सर्जन आणि वृक्षतोड यामुळे हवामानाचे चक्र अनियमित झाले आहे. फुलांच्या उमलण्याचा कालावधी बदलत आहे तर पक्ष्यांच्या प्रजनन व स्थलांतरावर याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. एकीकडे भूजलस्तर घटत चालले आहे व दुसरीकडे समुद्राच्या पाण्याचा स्तर वाढत चालला आहे. २०५० पर्यंत अनेक शहर व देश पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आताच जागे झाले नाही तर याचे भयानक परिणाम भविष्यात भोगावे लागणार, अशी भीती चटर्जी यांनी व्यक्त केली.

Web Title: Why the climate cycle changing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.