आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:53 IST2018-10-09T22:48:59+5:302018-10-09T22:53:03+5:30
असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी गठबंधन करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना विचारात घेतले नाही. एमआयएमशी जुळवून घेणाऱ्या आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का आहे, असा टीकात्मक सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जागेंद्र कवाडे यांनी केला आहे.

आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी गठबंधन करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना विचारात घेतले नाही. एमआयएमशी जुळवून घेणाऱ्या आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का आहे, असा टीकात्मक सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जागेंद्र कवाडे यांनी केला आहे.
मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत प्रा. कवाडे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी येत्या १७ आॅक्टोबरला आयोजित पीरिपाच्या राष्ट्रीय मेळावा व अधिवेशनाबाबत माहिती दिली. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, सपाचे आमदार अबू आझमी आदींना या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिल्याचे प्रा. कवाडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अॅड. आंबेडकर यांच्या भूमिकेवर टीका केली. देशात जातीय आणि धार्मिक उन्मादाला योजनाबद्ध रीतीने उत्तेजन देणाऱ्या रा.स्व.संघप्रणीत सत्तारूढ भाजपाला नमविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सेक्युलर मतांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र भारिप बहुजन महासंघाने एमआयएमशी युती केल्याने सेक्युलर मतांचे धु्रवीकरण होईल आणि भाजपाला लाभ मिळेल, अशी टीका त्यांनी केली. प्रा. कवाडे यांनी गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही निषेध केला. पंतप्रधानांच्या गृहराज्यात अशाप्रकारे कृत्य लाजिरवाणे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांकडून मुंबई बंद पाडण्याच्या संजय निरुपम यांच्या वक्तव्यावरही टीका केली. पत्रपरिषदेत थॉमस कांबळे, अरुण गजभिये, भगवानदास भोजवानी, संदीप मेश्राम, विजय पाटील, बाळूमामा कोसमकर, सारंग लांजेवार, भीमराव राऊत आदी उपस्थित होते.