होलसेल धान्य बाजार शनिवार व रविवारी बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:15+5:302021-04-17T04:07:15+5:30
नागपूर : कोरोना महामारीचे संक्रमण वाढत आहे. रुग्णांची संख्याही दररोज वाढत असून, त्याप्रमाणात मृत्यूही वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे ...

होलसेल धान्य बाजार शनिवार व रविवारी बंद राहणार
नागपूर : कोरोना महामारीचे संक्रमण वाढत आहे. रुग्णांची संख्याही दररोज वाढत असून, त्याप्रमाणात मृत्यूही वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही बाब ध्यानात ठेवून दि होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनने इतवारी आणि कळमना येथील धान्य बाजार शनिवार व रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत धान्य बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली. त्यांनी आपले सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन केले. मोटवानी म्हणाले, कोरोना रुग्ण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकही कोरोनाग्रस्त होत असल्याची माहिती आहे. अशा लोकांवर मनपा प्रशासनाने कठोर कारवाई करावी. कोरोना रुग्णांची ओळख व्हावी म्हणून त्यांच्या हातावर स्टॅम्प लावावा. व्यापारीसुद्धा पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणेच जीव धोक्यात घालून दुकान सुरू ठेवून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे करीत आहेत. त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध कराव्यात.