गुन्हे शाखेचे शिवधनुष्य कोण पेलणार ?
By Admin | Updated: June 4, 2014 01:09 IST2014-06-04T01:09:17+5:302014-06-04T01:09:17+5:30
सोन्याचा मुकुट वाटणारी गुन्हेशाखा कुण्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हवाली केली जाते, याकडे शहर पोलीस दलासोबतच नागपूरच्या गुन्हेगारी जगताचे लक्ष लागले आहे. शिवधनुष्य ठरावी अशी गुन्हेशाखेची जबाबदारी

गुन्हे शाखेचे शिवधनुष्य कोण पेलणार ?
नरेश डोंगरे - नागपूर
सोन्याचा मुकुट वाटणारी गुन्हेशाखा कुण्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हवाली केली जाते, याकडे शहर पोलीस दलासोबतच नागपूरच्या गुन्हेगारी जगताचे लक्ष लागले आहे. शिवधनुष्य ठरावी अशी गुन्हेशाखेची जबाबदारी कोणता वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेलणार, त्याकडे पोलीस दल आणि गुन्हेगारीवर लक्ष ठेवणार्या समाजातील जबाबदार घटकांची नजर लागली आहे.
शहरातील पोलीस ठाणी आणि पोलीस आयुक्तालयातील महत्त्वाचा दुवा म्हणजे गुन्हेशाखा. या गुन्हेशाखेचा पोलीस निरीक्षक म्हणजे ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकार्यांमधील सेतू ! त्यामुळे शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेट हस्तक्षेप (गुन्हेगारी, अवैध धंद्यावर लगाम लावण्यासाठी) करण्याची मुभा गुन्हेशाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास असते. अर्थात या पोलीस निरीक्षकाचा थाट एखाद्या पोलीस उपायुक्तांप्रमाणे असतो. या आणि याशिवाय अनेक ‘अर्थपूर्ण‘ कारणांमुळे गुन्हेशाखेचा पोलीस निरीक्षक बनण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसुसलेले असतात. गेली चार वर्षे अत्यंत कौशल्याने ही जबाबदारी पेलणारे माधव गिरी यांची राज्य गुन्हे अन्वेषण (स्टेट सीआयडी) विभागात बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता कुणाची वर्णी लागते, हा पोलीस दल आणि गुन्हेगारी जगताच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
एकीकडे देशाचे हृदयस्थळ अशी नागपूर शहराची ओळख आहे. संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमी अशी देशाला प्रेरणा देणारी स्थळे नागपूरचा गौरव आहे. दुसरीकडे देशभरातील सटोड्यांचे (बुकींचे) महत्त्वाचे सेंटर म्हणूनही नागपूर ओळखले जाते. ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील अमलीपदार्थ (खास करून गांजा तस्करांचे) तस्करांचे रेस्ट झोन, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आदी प्रांतातील शस्त्रविक्रेत्यांची (देशी कट्टे, माऊझर)बाजारपेठ म्हणूनही नागपूरचे नाव घेतले जाते.
बनावट नोटा चलनात आणणार्या आंतरराष्ट्रीय टोळीला नागपूर महत्त्वाचे डेस्टीनेशन वाटते. त्यात शहरात खून, गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील सूडसत्र, अपहरण, बलात्कार, लुटमार्या, कोट्यवधींच्या फसवणुकी आणि न थांबणार्या चेनस्नॅचिंगमुळे उभ्या महाराष्ट्रात नागपूर हे झपाट्याने वाढणार्या गुन्हेगारीचे शहर म्हणूनही ओळखले जाते.