शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

हत्तीने कुठे राहावे, हे माणूस कोण ठरवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 11:45 IST

गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरच्या कॅम्पमधील हत्तीचा कुटुंबकबिला थेट गुजरातच्या प्राणिसंग्रहालयात हलवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रश्नाच्या वेगवेगळ्या बाजू तपासताना कमलापूरच्या कॅम्पमध्ये मारलेला फेरफटका !

मनोज ताजने, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, नागपूर

नक्षलप्रभावित, जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात जंगलाच्या कुशीत असलेलं कमलापूर हे छोटंसं गाव आज चर्चेचा विषय झालं आहे ते तेथील हत्तींमुळे. महाराष्ट्रातील हत्तींसाठी हे हक्काचं घरच म्हणता येईल. १९६४ साली सुरू झालेल्या या ‘हत्ती कॅम्प’मधील बहुतांश हत्ती गुजरातमधील जामनगरमध्ये उभारल्या जात असलेल्या रिलायन्स ग्रुपच्या ‘प्राणी पुनर्वसन’केंद्रात (प्राणी संग्रहालय) नेण्याचा निर्णय झाला आणि पाहता पाहता गडचिरोलीकरांसह संपूर्ण राज्यभरातून त्याला विरोध होऊ लागला. मुळात हत्ती येथून हलविण्याची खरंच गरज आहे का?, तसे केल्यास त्याचे काय फायदे-तोटे होतील? गडचिरोली या जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या या हत्ती कॅम्पची वाट सध्या खडतर झाली आहे.

महामार्गावरच्या रेपनपल्ली या अवघ्या २०० लोकवस्तीच्या गावापासून उत्तरेकडे आत शिरल्यानंतर ४ किलोमीटरवर कमलापूर हे गाव दिसतं. तेथून आणखी पुढे ३ किलोमीटर गेलो की, डोंगरांच्या कुशीतील निसर्गरम्य हत्तींचा कॅम्प नजरेस पडतो. डोंगरांच्या पायथ्याशी असलेला तलाव, त्या तलावाच्या एका बाजूने बेटासारखा आत घुसलेला मोकळा परिसर आणि त्या ठिकाणी मुक्तपणे संचार करणारे हत्ती पाहताना मन प्रसन्न झाल्याशिवाय राहात नाही. या ठिकाणी सद्यस्थितीत ८ हत्ती आहेत. त्यात ६ मादी  आणि २ नर (शास्त्रीय भाषेत त्यांना ‘टस्कर’ म्हणतात) आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ याच वेळेत हत्ती कॅम्पमध्ये राहतात. एरवी ते परिसरातील ५ किलोमीटरपर्यंतच्या जंगलात मुक्तपणे संचार करून झाडांचा पाला, गवत, कोवळ्या बांबूंचा आस्वाद घेत असतात. या कुटुंबात १५ दिवसांपूर्वी प्रियंका या हत्तीणीने एका बाळाला जन्म दिला. त्या मादी पिलाचे नामकरण ‘लक्ष्मी’ असे करण्यात आले. सध्या कुटुंबातील सर्व सदस्य त्या बाळाची काळजी घेण्यात व्यस्त असतात. तलावात शिरून मुक्तपणे जलविहार, गूळ, तेल टाकून बनविलेले भाताचे गोळे खाऊन थोडा आराम केला की, हे गजराज पुन्हा जंगलाच्या दिशेने रवाना होतात, ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच परत कॅम्पमध्ये आणले जातात. हत्ती अनियंत्रित होऊ नये आणि विस्तीर्ण जंगलात खूप लांब जाऊ नये म्हणून त्यांच्या पायात साखळदंड घातले आहेत पण, त्याचा त्यांच्या मुक्त वावरण्यावर परिणाम होत नाही. अगदी डोंगरांची चढाई, उतारावरूनही ते सहज फिरतात. अशा मुक्त वातावरणातून प्राणी संग्रहालयाच्या बंदिस्त वातावरणात या हत्तींचे मन रमणार का?, हा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांना पडला आहे.

हे कमलापूर कधीकाळी नक्षल चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखले जायचे. आज ती स्थिती राहिलेली नाही. वर्षातून एखाद्या वेळी नक्षल्यांची पत्रकं गावातल्या चौकात पडतात एवढेच काय त्यांचे अस्तित्व राहिले आहे. एरवी नक्षलवाद्यांनीही कधी हत्तींना, त्यांच्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्रास दिलेला नाही.  तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी पर्यटकांसाठी काही सोयी केल्या. त्यात विसावा घेण्यासाठी काही कुट्या, स्वच्छतागृह, सामूहिक डबा पार्टी सारख्या कार्यक्रमासाठी शेड, तारांचे कंपाऊंड आणि कॅम्पच्या प्रवेशद्वारावर हत्तींचे दोन पुतळे उभारण्यात आले होते. या कामावर सव्वा कोटी रुपयांचा खर्च झाला. पण, काही दिवसानंतर नक्षलवाद्यांनी एका रात्री येऊन ते सर्व उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नंतर त्या कामाला हातच लावला नाही.

मात्र  ३ वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या स्थितीत बराच फरक पडलेला आहे. नक्षल्यांची संख्या, कुरापती कमी झाल्या आहेत. असे असतानाही प्रशासनाने नक्षल्यांच्या भीतीने या कामातून अंग काढून घेणे म्हणजे हार स्वीकारल्यासारखे आहे. वास्तविक ७ किलोमीटरवर रेपनपल्ली या मुख्य मार्गावरील उप पोलीस स्टेशन, वनविभागाचे कार्यालय कमलापूर हत्ती कॅम्पजवळ स्थानांतरित केल्यास, त्या परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे सुसज्ज क्वॉर्टर बनविल्यास कॅम्पवर सतत पाळत ठेवणे सोयीचे होईल आणि कोणतीही गडबड करण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. 

विशेष म्हणजे हत्ती गुजरातला जाणार असल्याच्या बातम्या वाचूनच महाराष्ट्रातील अनेक लोकांना असा हत्ती कॅम्प गडचिरोली जिल्ह्यात असल्याचे पहिल्यांदा माहीत झाले. पर्यटकांना आकर्षित करणे सोडा, त्यांना मार्गदर्शक ठरेल अशी माहितीसुद्धा कुठे उपलब्ध  नाही. अनेक पर्यटक अर्धवट माहितीवरून मजल-दरमजल करून कॅम्प गाठतात. पण, चुकीच्या वेळी पोहोचल्यानंतर हत्तींचे दर्शनही होत नाही, कारण  ते जंगलात निघून गेलेले असतात. लांबून आल्यानंतर नाश्ता, पाणी किंवा गरजेच्या वस्तू मिळण्याची सोयही कॅम्पच्या परिसरात नाही. पर्यटकांना इथल्या  निसर्गरम्य वातावरणात मुक्काम करावासा वाटल्यास कमलापुरात गेस्ट हाऊसही नाही. 

यावरून या कॅम्पकडे पाहण्याचा वनविभागाचाच नाही तर, जिल्हा प्रशासनाचाही दृष्टिकोन किती निरस आणि नकारात्मक आहे हे स्पष्ट होते. सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी तर, हत्तींना घेऊन जाणेच योग्य आहे, असा सूर आळवून आपला कल स्पष्ट केला. 

लगतच्या तेलंगणात राज्य सरकार तेथील मंदिरे, पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर भर देत आहे. पण, तिकडून कमलापूरमध्ये येणारे पर्यटक येथील गैरसोयी पाहून नाराज होतात, असे रेपनपल्लीचे उपसरपंच विलास नेरला सांगतात. 

- हत्ती कॅम्पमधील सर्वात जुने माहूत गन्नू वेलादी हे आता सेवानिवृत्त झाले आहेत. या कॅम्पमध्ये ते एकमेव प्रशिक्षित माहूत होते. पण, त्यानंतर कोणालाही वनविभागाने प्रशिक्षणासाठी पाठवले नाही.  नर हत्ती माजावर आल्यास तो थोडा आक्रमक होतो. अशावेळी त्याला कशा पद्धतीने हाताळायचे याचे प्रशिक्षण माहुतांना देणे गरजेचे आहे, असे वेलादी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लहान वयात हत्तींनाही योग्य प्रशिक्षण दिल्यास ते नियंत्रणात राहतात. मात्र प्रशिक्षित माहूतच नसल्यामुळे हत्तींना प्रशिक्षण कोण देणार?, हा प्रश्न आहे.

नव्वदीतल्या बसंतीला या वयात घर बदलणं कसं झेपेल ?

- या हत्तींच्या कुटुंबातील सर्वात वयोवृद्ध सदस्य असलेली ‘बसंती’ आता ८५ ते ९० वर्षाच्या घरात आहे. हत्ती कॅम्प सुरू झाला त्यावेळच्या ४ सदस्यांपैकी ती एकमेव आता हयात आहे. त्यामुळे कुटुंबप्रमुखाप्रमाणे ती आजही सर्वांचा सांभाळ करते. नुकत्याच जन्मलेल्या लक्ष्मीला तर, ती थोडा वेळही दूर ठेवत नाही. अवघ्या १५ दिवसात तिला आपल्या पणतीचा चांगलाच लळा लागला आहे. बसंतीच नाही तर, सर्व सदस्य लक्ष्मीला मध्ये ठेवूनच वावरताना दिसतात.

- दुपारचा आहार, आंघोळ अशा सर्वच ठिकाणी ते सोबत असतात. अशा या कुटुंबवत्सल हत्तींपैकी अर्ध्याहून अधिक हत्तींना तेथून दुसरीकडे नेल्यास ते एकमेकांशिवाय आनंदाने राहू शकतील का?, असा प्रश्न वन्यजीवप्रेमी व्यक्त करतात.

हत्ती हलविणे हाच पर्याय आहे का? 

- कॅम्पमधील हत्तींच्या आहारावर महिन्याकाठी जेमतेम एक लाख रुपयांचा खर्च होते. कारण ते बहुतांश आहार जंगलातूनच नैसर्गिकरित्या मिळवतात. त्यांच्या देखभालीसाठी नियमानुसार आवश्यक असलेले माहूत, चारा कटर ही पदे अर्धीही भरलेली नाहीत. ८ रोजंदारी मजुरांच्या भरवशावर काम भागविले जात आहे. हत्तींचे आरोग्य बिघडल्यास ताडोबा येथून पशुवैद्यकीय अधिकारी येतात. पण, नियमित तपासणीअभावी गेल्या दोन वर्षात हत्तींच्या तीन पिलांचा मृत्यू झाला.

- या कमतरता सोडल्यास येथे हत्ती सुखात आहेत. त्यामुळे हत्तींना हलविण्याची गरज नाही, अशी भावना कमलापुरातील संदीप ओलेटवार या युवकाने व्यक्त केली. तो सांगत होता, आम्हाला हत्तींमुळे कधी कोणता त्रास नाही. उलट हत्ती आहे म्हणून आमच्या गावाची ओळख आहे !

manoj.tajne@lokmat.com

टॅग्स :GujaratगुजरातnagpurनागपूरGadchiroliगडचिरोली