पांढरा डाग म्हणजे कुष्ठरोग नाही

By Admin | Updated: June 26, 2014 00:56 IST2014-06-26T00:56:05+5:302014-06-26T00:56:05+5:30

त्वचेवर पांढरा डाग दिसला की त्याचा संबंध कुष्ठरोगाशी लावण्याची गल्लत सर्रास केली जाते. हा डाग ‘व्हिटीलिगो’ही असू शकतो. याच्यावर उपचार शक्य आहे, अशी माहिती मेडिकलच्या त्वचा

White stains are not leprosy | पांढरा डाग म्हणजे कुष्ठरोग नाही

पांढरा डाग म्हणजे कुष्ठरोग नाही

आर.पी. सिंग यांची माहिती : ‘व्हिटीलिगो (पांढरे डाग) दिन’ विशेष
नागपूर : त्वचेवर पांढरा डाग दिसला की त्याचा संबंध कुष्ठरोगाशी लावण्याची गल्लत सर्रास केली जाते. हा डाग ‘व्हिटीलिगो’ही असू शकतो. याच्यावर उपचार शक्य आहे, अशी माहिती मेडिकलच्या त्वचा रोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. आर.पी. सिंग यांनी दिली.
२५ जून हा दिवस जागतिक ‘व्हिटीलिगो (पांढरे डाग) दिन’ प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सन यांच्या स्मृतिनिमित्तही पाळण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने डॉ. सिंग ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, शरीरावर पांढरे डाग असलेल्या व्यक्तींना अनेकदा सामाजिक कुचंबणेला सामोरे जावे लागते. हे डाग संसर्गजन्य असतील की काय, ही निरर्थक भीती यामागे असते. तसेच अंगावर पांढरा डाग आला म्हणजे तो डाग कोडाचा (श्वेतत्वचा) असेल असेही अनेकांना वाटते. या मागोमाग येते त्वचा विद्रुप दिसण्याची भीती. हे डाग लपवण्यासाठी अनेक मंडळी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात, मनात न्यूनगंड बाळगू लागतात. पण या आजारावर उपचार नक्कीच आहेत. गरज आहे मनातील भीती काढून टाकण्याची. त्वचेवर पांढरा डाग दिसला की त्याचा संबंध कुष्ठरोगाशी लावण्याची गल्लत करू नये. कुष्ठरोगात त्वचेवर फिकट पांढरे डाग/ चट्टे उमटतात, परंतु त्याबरोबर रु ग्णाला कुष्ठरोगाची इतर लक्षणेही दिसतात- उदा. डागांना संवेदना नसणे. त्यामुळे प्रत्येक वेळी पांढऱ्या डागांचा संबंध कुष्ठरोगाशी लावणे चुकीचे आहे. तसेच त्वचेवरील पांढरा डाग कोडाचा असेल या विचारानेही घाबरून जाणारे अनेक असतात. कुष्ठरोग आणि कोड यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. तसेच केवळ या दोन कारणांमुळेच त्वचेवर पांढरे डाग पडतात असेही नाही. पांढरे डाग येण्याची कारणे अनेक असू शकतात. (प्रतिनिधी)
-व्हिटीलिगोमध्ये त्वचेवर दुधासारखे पांढरे डाग येतात.
-हा कुष्ठरोग किंवा महारोग नाही.
-एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होत नाही.
-स्त्री आणि पुरुषांमध्ये समान प्रमाणात व कोणत्याही वयात होऊ शकतो.
-काही जणांमध्ये त्वचेवर थोडे पांढरे चट्टे येतात आणि ते वाढत नाही.
-तर काही जणांमध्ये चट्टे संपूर्ण त्वचेवर येऊ शकतात.
-उपचार उपलब्ध आहे.
-सुयोग्य उपचाराने चांगले परिणाम दिसून येतात.

Web Title: White stains are not leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.