भंडारा एसीबीची कारवाई : देयकाच्या मंजुरीसाठी मागितली लाच भंडारा : विद्युत पुरवठा योजनेच्या बांधकामाचे देयक काढण्यासाठी भंडारा येथील विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभागाचा कार्यकारी अभियंता सीताराम भोरे (५०) याने कंत्राटदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर १ लाख ६० हजार रुपयांची लाच घेताना भोरे याला शनिवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास रंगेहात पकडण्यात आले. सन १९९४ पासून राजू केशव भोयर रा.नागपूर हे या विभागात नोंदणीकृत कंत्राटदार आहेत. विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभागाच्यावतीने निघालेल्या निविदेप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेज येथे हाईस्ट मोटारला विद्युत पुरवठा करण्यासंबंधी संकल्पन पुरवठा उभारणी, चाचणी व कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. या कामाचे मूल्य २४ लाख ८१ हजार ९४० रुपये इतके होते. या बांधकामाचे प्रथम देयक १७ लाख ६ हजार २३८ रुपये मंजूर होऊन भोयर यांना मिळाले. मात्र अंतिम देयक ७ लाख ४ हजार ५८३ रुपये त्यांना मिळाले नाही. अंतिम देयकाचे ६ लाख ७८ हजार ७२३ रुपये हे देयक २६ जून रोजी मंजूर करण्यात आले. भंडारा उपसा सिंचन विभागाच्यावतीने प्रथम, द्वितीय व अंतिम देयकाचा स्वरुपात १५ लाख ८३ हजार ९९७ रुपयांचे देयक विभागीय कार्यालयाकडे सादर करण्यात आले. यापैकी २६ जून रोजी १५ लाख ३३ हजार ९३३ रुपये हे संपूर्ण देयक मंजूर करण्यात आले. कामे पूर्ण करुन अंतिम देयक सादर करण्यात आले होते, परंतु कार्यकारी अभियंता सीताराम भोरे यांनी कोणतेही कारण नसतानाही अंतिम देयक रोखून ठेवले. सदर कामाचे देयक मंजूर करण्यासाठी भोरे यांनी भोयर यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. भोयर यांच्या तक्रारीवरुन प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारला दुपारच्या सुमारास भोरे यांना पकडण्यासाठी सापळा रचला. तडजोडीनंतर भोरे यांनी १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम मागितली होती. तकिया वार्डातील स्रेहनगर येथे भाड्याने राहत असलेल्या घरी सीताराम भोरे यांनी ही रक्कम भोयर यांच्याकडून स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने त्यांना रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहायक फौजदार हेमंत उपाध्याय, हवालदार महेंद्र सरपटे, अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, सचिन हलमारे, शेखर देशकर, पराग राऊत, अश्विन गोस्वामी, मनोज पंचबुध्दे, रसिका कंगाले, मनोज चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)
दीड लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता जाळ्यात
By admin | Updated: July 20, 2014 01:16 IST