लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन नागपूर साकारताना राज्य सरकारकडून सर्वच बाजूंचा विचार करण्यात येत आहे. तेथील शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही, प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल, असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नवीन नागपूरसंदर्भात काही जणांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जेव्हा प्रत्यक्षात जमिनींचे संपादन होईल तेव्हा शेतकऱ्यांशी थेट चर्चा करण्यात येईल. नियमाप्रमाणे त्यांना मोबदला देण्यात येईल. त्याबाबत त्यांनी निश्चिंत रहावे असे बावनकुळे म्हणाले.बंजारा आरक्षण मोर्चावरदेखील त्यांनी भाष्य केले. प्रत्येक समाजाची मागणी त्या समाजाला न्याय मिळण्यासाठी येत असते. आरक्षणाचे नियम कायदे आहेत व आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. बंजारा आरक्षणाबाबत जी मागणी आली आहे त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पीक नुकसानीची भरपाई देणार
शेतकऱ्यांच्या शेतीमधील पिकाच्या नुकसान भरपाईबद्दल मुख्यमंत्र्यांनी अगोदरच प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची नियमानुसार भरपाई देण्याची शासनाची तयारी आहे. त्या दृष्टीने पंचनामेदेखील सुरू झाले आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
उद्धव ठाकरेंचा तोल घसरलेला आहे
उद्धव ठाकरेंचा तोल घसरलेला आहे. काँग्रेसने त्यांना सोडून गेलेली आहे हे त्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीचे अनेक लोक नाराज होऊन तोंड फिरवत आहेत. मतांचे राजकारण करण्याची उद्धव यांनी जी खेळी केली होती ती आता फसली आहे. त्यामुळे निराश झाल्याने अशी वाट्टेल तशी वक्तव्ये करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.