अवाजवी वीज बिलांसाठी पैसा आणायचा कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST2021-02-14T04:10:15+5:302021-02-14T04:10:15+5:30
चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : शेतमालाला बाजारात मिळणारा कमी भाव, नापिकी आणि काेराेना संक्रमण यामुळे शेतकरी आधीच ...

अवाजवी वीज बिलांसाठी पैसा आणायचा कुठून?
चक्रधर गभणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : शेतमालाला बाजारात मिळणारा कमी भाव, नापिकी आणि काेराेना संक्रमण यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषिपंपांचे अवाजवी विजेचे बिल पाठविले आहे. बिल भरण्यासाठी त्या बिलांमध्ये नमूद असलेली एक ते दाेन लाख रुपयाची रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुसरीकडे, बिल न भरल्याने महावितरण कंपनीने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ओलिताची समस्या ऐरणीवर आली आहे.
माैदा तालुक्यातील रेवराल, खंडाळा परिसरात सध्या मिरची, गहू, हरभरा व काही भाजीपाल्याची पिके आहेत. या पिकांना सतत पाण्याची अर्थात ओलिताची आवश्यकता आहे. त्यातच महावितरण कंपनीने कृषिपंपधारक शेतकऱ्यांना विजेची बिले पाठविली असून, बहुतांश बिलांमध्ये थकीत रक्कम ही एक लाख रुपयापेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. काहींना एक लाख रुपये, काहींना दीड लाख रुपये तर काहींना १ लाख ८० हजार रुपयांची बिले प्राप्त झाली आहेत.
यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ही थकीत बिले असल्याची माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे, महावितरण कंपनीने आपल्याला सन २०११ पासून आजवर एकही बिल पाठविले नाही. तेव्हापासून आजवरच्या बिलांची एकमुस्त वसुली महावितरण कंपनी करीत असल्याचा आराेप मांगली (ता. माैदा) येथील सुधीर मुमनेनी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरण कंपनीने मागील सात वर्षे बिले का पाठविली नाहीत. त्यांना आताच जाग आली का, असा प्रश्न करीत हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आराेपही काहींनी केला.
यावर्षी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे धानाच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात माेठी घट आली आहे. त्यामुळे त्यांनी रबी व भाजीपाल्याच्या पिकांवर लक्ष केंद्रित केले. आता वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने रबी पिकेही हातची जाण्याची शक्यता बळावली आहे.
....
पिके धाेक्यात
रेवराल, खंडाळा मांगली येथील ९० टक्के शेतकऱ्यांकडील कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पिकांचे ओलित करणे शक्य हाेत नाही. शिवाय, या भागात कृषिपंपाशिवाय ओलिताचे दुसरे साधनही शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे पाण्याअभावी पिके धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. शासनाच्या या प्रकारामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद हाेणार असून, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
...
महावितरण कंपनी वीजचाेरी करणाऱ्यांवर काेणतीही कारवाई करीत नाही. त्यांनी आमच्याकडे बिलाची रक्कम असल्याचे सांगून ती न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजचाेरीचा भुर्दंडही आमच्याकडूनच वसूल केला जाताे. कंपनीने आम्ही वापरलेल्या वीज युनिटचे नियमित बिल द्यावे. सरासरी व अवाजवी बिलाची आकारणी करू नये.
- सुधीर मुमनेनी,
शेतकरी, रा. मांगली, ता. माैदा.
...
कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ही कारवाई राज्य शासनाच्या आदेशान्वये केली जात आहे. शेतकऱ्याने त्यांच्याकडे थकीत असलेल्या बिलाची ५० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. माैदा तालुक्यात टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा खंडित करणे आणि बिलाचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करणे सुरू आहे.
- रूपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता,
महावितरण कंपनी, माैदा.