ग्रामीण रुग्णालय सुरू हाेणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:27+5:302021-04-11T04:08:27+5:30
ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या काेंढाळी (ता. काटाेल) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रावरील ताण ...

ग्रामीण रुग्णालय सुरू हाेणार कधी?
ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या काेंढाळी (ता. काटाेल) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रावरील ताण तसेच अपघातातील जखमी व रुग्णांची गरज लक्षात घेता या आराेग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेत त्यावर राज्य शासनाने शिक्कामाेर्तब केले. त्याअनुषंगाने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही सुरू करण्यात आले. मात्र, शासनाने या बांधकामाला वेळाेवेळी पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्याने इमारतीसाेबतच रुग्णालयाचे काम सात वर्षांपासून रखडले आहे.
सध्या नागपूर जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यात काटाेल तालुकाही अपवाद नाही. काेंढाळी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम नियाेजित काळात पूर्ण करून हे रुग्णालय सुरू केले असते तर आज किमान १०० काेराेना रुग्णांवर या रुग्णालयात उपचार करणे शक्य झाले असते. परंतु, गेल्या सात वर्षांत आश्वासनांशिवाय पदरात काहीही पडले नाही. या रुग्णालयासाठी चार काेटी रुपयांची आवश्यकता असूनही ताे निधीही देण्यास शासन टाळाटाळ करीत असून, स्थानिक लाेकप्रतिनिधी त्याकडे गांभीर्याने बघत नाहीत.
तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सुनीता गावंडे यांनी काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला हाेता. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचेही जाहीर करण्यात आले. या रुग्णालयात बाह्यरुण विभाग, प्रयोगशाळा, एक्स-रे युनिट, शवविच्छेदनगृह, आदींच्या इमारतींचे बांधकाम तसेच इतर कामे ८० टक्के पूर्णत्वास आली आहेत. येथे आवश्यक फर्निचर व इतर महत्त्वाच्या सोयी-सुविधांसाठी चार कोटी ३३ लाख रुपयांची गरज आहे. या निधीची शासनाकडे वारंवार मागणी केली जात असून, ताे सात वर्षांपासून दिला जात नसल्याने काम ठप्प आहे.
तत्कालीन आराेग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ जानेवारी २०१९ राेजी या रुग्णालयाची पाहणी केली. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्याअनुषंगाने ६ जून २०१९ राेजी या ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, परिचारिकांसह एकूण २५ पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे रुग्णालय लवकरच सुरू हाेणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या; परंतु चार काेटी ३३ लाख रुपयांचा निधी न मिळाल्याने काम पुढे सरकू शकले नाही. सध्या येथील विविध उपकरणे व सुविधांसाठी पाच काेटी रुपयांची आवश्यकता असून, शासन तेही द्यायला तयार नाही. निधीचा तिढा साेडवून हे रुग्णालय तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.
...
जखमी व रुग्णांची गैरसाेय
काेंढाळीची लाेकसंख्या २० हजारांच्या वर असून, या प्राथमिक आराेग्य केंद्राला जाेडण्यात आलेल्या गावांमध्ये ७० गावे आदिवासीबहुल आहेत. या सर्व गावांमधील आदिवासी बांधव व इतर गरीब याच प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचाराला येतात. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बहुतांश भाग या आराेग्य केंद्राच्या हद्दीतून गेला असल्याने या महामार्गावरील अपघातातील जखमींवर प्रथमाेपचार करण्यासाठी याच प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले जाते. या महामार्गावर अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. या आराेग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागात दरवर्षी ३५ हजारपेक्षा अधिक रुग्णांची नाेंद केली जाते. या आराेग्य केंद्रातील सुविधांच्या अभावामुळे जखमी व गरीब रुग्णांची माेठी गैरसाेय हाेते. ग्रामीण रुग्णालयामुळे ही गैरसाेय दूर झाली असती.
...
दाेनदा भूमिपूजन
या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे दाेनदा भूमिपूजन करण्यात आले. पहिले भूमिपूजन तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते २७ जून २०१४ राेजी करण्यात आले. त्यानंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना तत्कालीन आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनीही याच इमारतीचे भूमिपूजन केले. हे जिल्ह्यातील माेठे ग्रामीण रुग्णालय राहणार असून, त्यात सुरुवातीला ५० खाटांची व्यवस्था केली जाईल. नंतर खाटांची संख्या १०० पर्यंत वाढविली जाईल, यासह अन्य बाबीही लाेकप्रतिनिधींच्या वतीने सांगण्यात आल्या. वास्तवात, परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.