माेहपा नगरपालिकेला मुख्याधिकारी मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:13+5:302020-12-09T04:08:13+5:30
माेहपा : नगरपालिकेला तीन वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने कारभाराचा डाेलारा प्रभारी मुख्याधिकारी सांभाळत आहेत. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिका प्रशासनाने ...

माेहपा नगरपालिकेला मुख्याधिकारी मिळणार कधी?
माेहपा : नगरपालिकेला तीन वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने कारभाराचा डाेलारा प्रभारी मुख्याधिकारी सांभाळत आहेत. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिका प्रशासनाने पारित केलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीस विलंब व शहरातील विकास कामे प्रभावित हाेत आहेत.
पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिला नाही, शिवाय प्रशासनाच्या कामकाजाची गती मंदावली आहे. सभागृहात मंजूर केलेल्या ठरावांना वरिष्ठ कार्यालयाकडून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळविणे, त्याचा पाठपुरावा करणे, कामांचे नियाेजन करणे, नागरिकांच्या समस्या मार्गी लावणे, यासह अन्य महत्त्वाच्या बाबींना दीर्घ दिरंगाई हाेत आहे. शहरातील गळबर्डी भागातील काही कामे १० वर्षांपासून रखडली आहेत.
रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे, कविवर्य बन्साेड-गळबर्डी, आठवडी बाजार-बुधवारपेठ-माेठा पूल, महात्मा गांधी चाैक-म्हसेपठार, स्मशानभूमी या राेडच्या दुरुस्तीची कामे रेंगाळली आहेत. आठवडी बाजारातील ओट्यांचे बांधकाम, मटन मार्केटचा विस्तार, नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम, शहराच्या मध्य भागातून गेलेल्या मधुगंगा नदीची साफसफाई, दलित स्मशानभूमीचा रस्ता, हिंदू स्मशानभूमीचा विकास, मधुगंगा नदीवरील माेठ्या पुलाचे बांधकाम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, दलित व दलितेतर वस्त्यांमधील विकास रस्ते व नाल्यांचे बांधकाम थंडबस्त्यात आहेत.
शहराचा सिटी सर्व्हे करण्यात आला असून, मालमत्तांची सनद तयार झाली नाही. लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास याेजनेचे अनुदान मिळाले नाही. अशी अनेक कामे पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने रखडली आहेत.
---
साडेतीन वर्षात आठ प्रभारी
या पालिकेतील मुख्याधिकाऱ्याचा प्रभार २९ जून २०१७ पासून आजवर माेहपा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार आठ वेगवेगळ्या मुख्याधिकाऱ्यांकडे साेपविण्यात आला. कळमेश्वरच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्याकडे २५ जुलै २०१९ पासून या पालिकेचा प्रभार आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. कर्मचाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नसल्याने ते कार्यालयात वेळेवर हजर राहत नाही.
---
मंजूर प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी तसेच प्रत्येक विकास कामात सातत्य ठेवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पूर्णवेळ व अनुभवी मुख्याधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे.
- शाेभा कऊटकर,
नगराध्यक्ष, माेहपा.