म्हसली ग्रामपंचायतीचे स्थानांतरण हाेणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:56+5:302021-01-13T04:18:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : गाेसेखुर्द प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील म्हसली गावाचे पुनर्वसन केशाेरी शिवारात झाले आहे. पुनर्वसनस्थळी घरे बांधून ...

म्हसली ग्रामपंचायतीचे स्थानांतरण हाेणार कधी?
लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : गाेसेखुर्द प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील म्हसली गावाचे पुनर्वसन केशाेरी शिवारात झाले आहे. पुनर्वसनस्थळी घरे बांधून नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु ग्रामपंचायत मात्र जुन्याच गावात असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे म्हसली ग्रामपंचायतीचे स्थानांतरण हाेणार कधी, असा सवाल गावकरी विचारत आहेत.
गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीचे नवीन गावठाणात स्थानांतरण करण्याबाबत गावकऱ्यांनी कित्येकदा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली. परंतु त्यास केराची टाेपली दाखविण्यात आल्याचा आराेप गावकऱ्यांचा आहे. संबंधित अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने भाऊराव रामटेके यांच्यासह गावकऱ्यांनी आंदाेलनाचा इशारा दिला आहे. म्हसली गावाचे पुनर्वसन दाेन ठिकाणी झाले आहे. यात ज्या प्रकल्पग्रस्तांची शेतजमीन लाभक्षेत्रात आहे, त्यांचे पुनर्वसन बाेरी शिवारात करण्यात आले. मात्र ज्यांची शेतजमीन काहीही शिल्लक नाही, अशा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केशाेरी शिवारात करण्यात आले. यामध्ये जवळपास ८० टक्के प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केशाेरी शिवारात तर २० टक्के गावकऱ्यांचे पुनर्वसन बाेरी शिवारात केले आहे.
पुनर्वसित केशाेरी शिवारात ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्रकल्पग्रस्त गावकरी घरे बांधून वास्तव्यास आहेत. मात्र ग्रामपंचायतीचे अद्यापही स्थानांतरण झाले नसल्याने गावकऱ्यांना महत्त्वपूर्ण कामे करण्यास अडचणी येत आहे. ग्रामपंचायतीच्या स्थानांतरणाबाबत निवेदन देऊनही संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्षच करीत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून ग्रामपंचायतीचे पुनर्वसनस्थळी स्थानांतरण करण्यात यावे, अन्यथा आंदाेलनाचा इशारा भाऊराव रामटेके यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे.