लोहगड नाला मधुगंगा जलाशयाला जाेडणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:47+5:302021-02-09T04:10:47+5:30

संजय गणाेरकर लाेकमत न्यूज नेटवर्क मोहपा : शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मधुगंगा नदीवर शहराच्या पश्चिमेस चार किमीवरील खुर्सापार (रिठी) ...

When will Lohgad Nala join Madhuganga reservoir? | लोहगड नाला मधुगंगा जलाशयाला जाेडणार कधी?

लोहगड नाला मधुगंगा जलाशयाला जाेडणार कधी?

संजय गणाेरकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

मोहपा : शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मधुगंगा नदीवर शहराच्या पश्चिमेस चार किमीवरील खुर्सापार (रिठी) शिवारात मधुगंगा जलाशयाची (लघु प्रकल्प) निर्मिती करण्यात आली आहे. मागील वर्षीचा अपवाद वगळता पाणी साठवण क्षमता कमी हाेऊनही हे जलाशय वर्षानुवर्षे पूर्ण क्षमतेने भरत नाही. यातील जलसंचय वाढावा म्हणून लाेहगड शिवारातील नाला या जलाशयाला जाेडण्याचा प्रस्ताव पुढे आला हाेता. परंतु, त्यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार केला नाही. यासाठी स्थानिक लाेकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

राज्य शासनाने ६१ वर्षांपूर्वी अर्थात सन १९५९ मध्ये मधुगंगा लघुसिंचन प्रकल्पाची निर्मिती केली. त्यासाठी तत्कालीन मंत्री बॅरि. शेषराव वानखेडे यांनी पुढाकार घेतला हाेता. हा नागपूर जिल्ह्यातील पहिला लघुसिंचन प्रकल्प असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांना ओलितासाठी पाणी मिळावे, शहरांना पिण्यासाठी पाणी मिळावे तसेच भूगर्भातील पाणी पातळी वाढावी, हा या प्रकल्पाच्या निर्मितीमागचा मूळ उद्देश हाेता.

या जलाशयाचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा त्यात लाेहगड नाल्यातील पाणी साठविले जायचे. जास्त पर्जन्यमानामुळे हा जलाशय दरवर्षी ओव्हरफ्लो व्हायचा. त्यामुळे नदीतीरावरील म्हसेपठार, मोहपा, मोहगाव, सावंगी, वाढोणा या गावांना पुराचा फटकाही बसायचा. ही समस्या साेडविण्यासाठी लाेहगड नाला अन्यत्र वळविण्यात आला, असेही जाणकार व्यक्तींनी सांगितले. अलीकडच्या काळात कमी पर्जन्यमानामुळे हा जलाशय क्वचितच ओव्हरफ्लो होतो. किंबहुना, पूर्ण क्षमतेने भरताे. त्यामुळे ही समस्या साेडविण्यासाठी लाेहगड नाला पुन्हा या जलाशयाला जाेडणे अत्यावश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...

पाणी साठवण क्षमता घटली

मधुगंगा नदीवरील हा जलाशय नदीच्या उगमापासून जवळ असल्याने त्यात पाण्याची आवक कमी आहे. शिवाय, कित्येक वर्षांपासून त्यातील गाळ काढण्यात न आल्याने एकीकडे त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली असून, दुसरीकडे जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाणही मंदावले आहे. मधुगंगा नदीच्या उगमापासून तर जलाशयापर्यंत नदीवर ठिकठिकाणी बंधारे तयार केले आहेत. त्यामुळे या जलाशयाची पाण्याची आवक कमी झाली आहे.

...

पाण्याची समस्या ऐरणीवर

या जलाशयातून माेहपा (ता. कळमेश्वर) शहराला ६० टक्के पिण्याचा पुरवठा केला जाताे. जलाशयाच्या परिसरात संत्रा व माेसंबीच्या बागा असून, बागायती शेती आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी सिंचनासाठी याच जलाशयातील पाण्याची उचल करतात. जलाशय पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने तसेच गाळामुळे पाणी झिरपण्याची प्रक्रिया थांबल्यागत झाल्याने परिसरातील विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी सिंचनासाठी वापरावे लागते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. यासह गुरांच्या पाण्याच्या पाण्याची समस्याही उद्भवते.

...

मधुगंगा जलाशय माेहपा व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या भागातील मधुगंगा वगळता सर्व जलाशये दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरतात. या जलाशयाच्या पुनरुज्जीवनासाठी लाेहगड नाला जलाशयाला जाेडणे व त्यातील गाळ काढणे गरजेचे आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात असून, लाेकप्रतिनिधींनीही लक्ष द्यायला हवे.

- शाेभा कऊटकर,

नगराध्यक्ष, माेहपा.

Web Title: When will Lohgad Nala join Madhuganga reservoir?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.