कारगाव उपकेंद्राला डॉक्टर कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:49+5:302021-02-24T04:09:49+5:30
शरद मिरे लोकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत व राजकीय मातब्बरांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारगाव आरोग्य उपकेंद्रात गत ...

कारगाव उपकेंद्राला डॉक्टर कधी मिळणार?
शरद मिरे
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत व राजकीय मातब्बरांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारगाव आरोग्य उपकेंद्रात गत वर्षभरापासून डॉक्टरचे पद रिक्त आहे. त्यामुळे इकडून तिकडून रिकाम्या जागा भरत, येथे प्रभारी तत्त्वावर आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. या गलथान कारभारामुळे मंगळवारी (दि.२३) उपकेंद्रात आलेल्या गर्भवती महिला व लसीकरणासाठी आलेल्या चिमुकल्यांना उपचाराविनाच परतावे लागले.
अंदाजे अडीच हजार लोकसंख्येच्या कारगाव येथे आरोग्य उपकेंद्र अर्थात ॲलाेपॅथी डिस्पेन्सरी आहे. या उपकेंद्रांतर्गत परिसरातील ८ ते १० गावांचा समावेश आहे. असे असताना गेल्या वर्षभरापासून येथील डॉक्टरचे पद रिक्त आहे. त्यामुळे मेढा उपकेंद्रात कर्तव्यावर असलेल्या डॉ. रक्षा कोतकेलवार यांच्याकडे कारगाव उपकेंद्राचा प्रभार आहे. दोन उपकेंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या २० वर गावातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविताना कर्तव्यावरील एकमेव महिला डॉक्टरची चांगलीच दमछाक होत आहे.
कारगाव उपकेंद्रात यापूर्वी डॉ. गोस्वामी कर्तव्यावर होते. ३१ मे २०२० रोजी त्यांची बदली झाली. तेव्हापासून रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर अद्यापही कायमस्वरूपी डॉक्टर पाठविण्यात आला नाही. महत्त्वाचे म्हणजे, याच उपकेंद्रात इतर पदेसुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे या उपकेंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपसरपंच रमेश खाटीक, निखिल भोगे, विनोद कुरुडकर, दिनेश झिंगरे, लोकेश दडवे, संदीप गिरडकर, रतिराम नक्षिणे, अमित भोगे, राम वाटे व ग्रामस्थ विचारत आहेत.
....
उपचाराविनाच गर्भवती परतल्या
या उपकेंद्रांतर्गत मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी परिसरातील गर्भवती माता व जन्माला आलेल्या बालकांना नियमित लसीकरण केले जाते. त्यामुळे मंगळवारी (दि.२३) परिसरातील गर्भवती महिला व चिमुकल्या बालकांसह त्यांच्या माता वेळेत उपकेंद्रात पोहाेचल्या. मात्र येथे डॉक्टरच नव्हते. ही बाब कळताच, सरपंच माधुरी दडवे यांनी उपकेंद्र गाठले. त्यांनी संबंधित वरिष्ठांना फोनवरून कळविले. त्यानंतर दुपारी ११ वाजताच्या सुमारास प्रभारी डॉ. रक्षा कोतकेलवार उपकेंद्रात पोहाेचल्या. मात्र तोपर्यंत बहुतांश गर्भवती महिला उपचाराविनाच परत गेल्या होत्या.
....
गेल्या अनेक महिन्यापासून या आरोग्य उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नाही. याबाबत संबंधितांकडे अनेकदा मागणी करण्यात आली. मेढा उपकेंद्रातील महिला डॉक्टर या उपकेंद्राचा प्रभार सांभाळत असल्याने येथे वेळेत आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे कारगाव येथे कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करावा.
- रमेश खाटीक,
उपसरपंच, कारगाव.