अवैध वृक्षतोड कधी थांबणार!

By Admin | Updated: June 30, 2014 00:37 IST2014-06-30T00:37:54+5:302014-06-30T00:37:54+5:30

अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून

When will the illegal tree fall! | अवैध वृक्षतोड कधी थांबणार!

अवैध वृक्षतोड कधी थांबणार!

पवनी येथील घटना : आरोपी ठेकेदाराची जामिनावर सुटका
नागपूर : अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जंगलाचा सफाया करीत आहे. पवनी वनपरिक्षेत्रातील घटना याचाच एक भाग मानल्या जात आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोडीचा हा गोरखधंदा कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माहिती सूत्रानुसार पवनी वनपरिक्षेत्रातील कुसदा बिटामधील कक्ष क्र. २९९ येथील संरक्षित जंगलातील लाखो रुपयांच्या सागाच्या झाडांची अवैध कटाई झाली आहे. मात्र असे असताना वन विभाग यातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बचाव करताना दिसून येत आहे. त्यामुळे अजूनपर्यंत एकही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई झालेली नाही.
दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी ठेकेदार प्रेमलाल देशवानी याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती आहे. आरोपी ठेकेदाराने गत १२ ते १५ दिवसांपूर्वी स्थानिक वन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून ही अवैध वृक्षतोड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गत १५ दिवसांपासून त्याची कुठेही वाच्यता झाली नाही. परंतु एका त्रयस्थ व्यक्तीला त्याची चाहूल लागताच, त्यांनी थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला. त्यानंतर वरिष्ठांकडून नागपूरचे मुख्य वनसंरक्षक व विभागीय वन अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश मिळताच, शुक्रवारी सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
आरोपी ठेकेदाराने वन विभागाचे कक्ष क्र. २९९ शेजारच्या दोन खसऱ्यामधील सागाच्या झाडांची खरेदी केली होती. त्यानुसार वन विभागाने त्याला ती झाडे तोडून त्यांची वाहतूक करण्याचा परवानाही जारी केला होता. मात्र आरोपीने त्या दोन खसऱ्यासोबतच शेजारच्या कक्ष क्र. २९९ मधील शेकडो झाडांची अवैध कटाई केली. वन विभागाने केलेल्या चौकशीत येथे १४०० नगांची अवैध कटाई झाल्याचे उघडकीस आले आहे.
हा संपूर्ण माल ७३ घनमीटर असून, त्याची खुल्या बाजारातील किमत २० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय घटनास्थळी ४०० थूट आढळून आले आहे. मात्र वन विभागाने त्यापैकी १६७ थुटांचीच मोजणी करून, त्यांची किमत १३ लाख रुपये आकारल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: When will the illegal tree fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.