राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : ऑनलाईन नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील धानाचे पूर्णपणे माेजमाप न करताच राज्य शासनाने रामटेक तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्र बंद केली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी दरात व्यापाऱ्यांना धान विकावा लागत आहे. त्यातच त्या शेतकऱ्यांनी शासनाला धान विकला, त्या शेतकऱ्यांना बाेनसची रक्कम अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे बाेनसची रक्कम मिळणार कधी, असा प्रश्न रामटेक तालुक्यातील नाेंदणीकृत शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाने या हंगामात महाराष्ट्र राज्य काे-ऑपरेटिव्ह फेडरेशन व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू केली हाेती. या केंद्रांवर शेतकऱ्यांकडील धानाची किमान आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी करण्यात आली. शिवाय, शेतकऱ्यांना पहिल्या ५० क्विंटल धानावर प्रतिक्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची घाेषणाही शासनाने केली हाेती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार सातबारा व इतर कागदपत्र सादर करून धान विक्रीसाठी या केंद्रांवर नाेंदणी केली हाेती.
शासनाने या केंद्रांवर ३१ मार्चपर्यंत धानाची खरेदी करण्यात येणार असल्याचेही आधीच स्पष्ट केले हाेते. मात्र, मध्यंतरी केंद्रावरील धानाची उचल न केल्याने धान खरेदी किमान महिनाभर बंद ठेवण्यात आली हाेती. त्यातच या सर्व केंद्रांवरील धानाच्या खरेदीचा वेगही सुरुवातीपासून संथ हाेता. या दिरंगाईमध्ये आदिवासी विकास महामंडळाची सर्वच केंद्र आघाडीवर हाेती. त्यातच शासनाने ३१ मार्च राेजी धान खरेदी बंद केली आणि शेतकऱ्यांची गाेची झाली.
यावर्षी प्रतिकूल वातावरण आणि परतीच्या पावसामुळे धानाच्या पिकाचे माेठे नुकसान झाले. तुडतुडे व करपा राेगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनातही घट आली. या तावडीतून पिकाला वाचवण्यासाठी माेठ्या प्रमाणात महागड्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात आल्याने धानाच्या उत्पादन खर्चातही वाढ झाली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना धानाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही पीक विमा कंपन्यांनी परतावा नाकारला. मार्चमध्ये धानाचे चुकारे आणि बाेनसची रक्कम न मिळाल्याने अनेकांना ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची परतफेड करणेही शक्य झाले नाही. त्यामुळे शासनाने किमान नाेंदणीकृत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात बाेनसची रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी धनराज झाडे, साेमा डडुरे, बबलू काठाेके, अंगद माेहने यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
....
शासनाच्या निर्णयामुळे नामुष्की
महाराष्ट्र राज्य काे-ऑपरेटिव्ह फेडरेशनने रामटेक खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. या केंद्रावर नाेंदणीकृत १,१०० शेतकऱ्यांकडील धानाचे अद्याप माेजमाप करण्यात आले नाही. आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवरील धानाचे माेजमाप करण्यात न आलेल्या शेतकऱ्यांची संख्या बरीच माेठी आहे. सध्या खुल्या बाजारात धानाच्या दरात माेठी घसरण झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करण्याची नामुष्की शासनाच्या निर्णयामुळे ओढवली आहे.
....
प्रति क्विंटल १,३०० रुपयांचे नुकसान
या खरेदी केंद्रावर धानाची प्रतिक्विंटल १,८६८ रुपये (किमान आधारभूत किंमत) खरेदी करण्यात आली असून, पहिल्या ५० क्विंटल धानाला प्रतिक्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २,८६८ रुपये भाव मिळाला. खुल्या बाजारातील धानाचे दर यापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्रावर धानाची विक्री करण्यास प्राधान्य दिले हाेते. माेजमाप पूर्ण न करता खरेदी बंद करण्यात आल्याने या शेतकऱ्यांना आता १,२०० रुपये प्रतिक्विंटल धान विकावे लागत असल्याने त्यांना प्रतिक्विंटल १,३०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.