निकालांचा खेळखंडोबा थांबणार कधी?
By Admin | Updated: August 5, 2015 02:36 IST2015-08-05T02:36:31+5:302015-08-05T02:36:31+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनातर्फे जास्तीत जास्त बाबी ‘आॅनलाईन’ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

निकालांचा खेळखंडोबा थांबणार कधी?
नागपूर विद्यापीठ : संकेतस्थळावर माहिती ‘अपडेट’च नाही
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनातर्फे जास्तीत जास्त बाबी ‘आॅनलाईन’ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु विद्यार्थ्यांपर्यंत निकाल पोहोचविणाऱ्या संकेतस्थळाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्याभरापासून निकालांची माहिती ‘अपडेट’ झालेली नाही. याबाबत विद्यापीठाने कुठलेही पाऊल उचललेले नाही. नेमके निकाल लागले किती असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
विद्यापीठाकडून सर्व निकाल ‘आॅनलाईन’ पद्धतीने जाहीर करण्यात येतात. यंदाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेले आहेत. विद्यापीठाकडून संकेतस्थळावर निकाल कधी लागतील याचे वेळापत्रक असलेली यादी टाकण्यात आली होती. परंतु यातील अनेक निकाल जाहीर झालेले नाहीत. निकाल कधी लागतील याबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत आहे. संकेतस्थळानुसार विद्यापीठाच्या ९५६ उन्हाळी परीक्षांपैकी केवळ ४७० निकाल जाहीर झालेले आहेत. याची टक्केवारी ही सुमारे ५० टक्के इतकीच आहे. (प्रतिनिधी)
प्रत्यक्षात लागले ५९९ निकाल
दरम्यान, यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.अनिल हिरेखण यांच्याशी संपर्क साधला असता निकालांबाबत वेगळीच माहिती मिळाली. प्रत्यक्षात आतापर्यंत ९५६ पैकी ५९९ म्हणजेच सुमारे ६३ टक्के निकाल जाहीर झालेले आहेत. १९७ निकाल जाहीर होण्याच्या प्रक्रियेत असून १५४ निकाल लागायचे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संकेतस्थळावर ही माहिती अपडेट का झालेली नाही याबाबत त्यांनादेखील माहिती नव्हती.
कारवाई होणार का?
एरवी विद्यार्थ्यांनी एक दिवस उशिरा प्रवेश घेतला की लगेच त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येते. परंतु विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचविणारे संकेतस्थळ ‘अपडेट’ न ठेवणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधितांना परीक्षा विभागाकडून निकालांची पूर्ण माहिती पोहोचविण्यात येत आहे. परंतु तरीदेखील ‘अपडेट’ का होत नाही हा प्रश्नच आहे.