बार्टीच्या जेईई, नीट प्रशिक्षणाचा मुहूर्त कधी निघणार; हजारो विद्यार्थी प्रशिक्षण सुरु होण्याच्या प्रतीक्षेत

By आनंद डेकाटे | Updated: June 6, 2025 21:27 IST2025-06-06T21:26:53+5:302025-06-06T21:27:13+5:30

दहावीचा निकाल लागून महिना झाला

When will Barty's JEE, NEET training begin?: Thousands of students are waiting for the training to start | बार्टीच्या जेईई, नीट प्रशिक्षणाचा मुहूर्त कधी निघणार; हजारो विद्यार्थी प्रशिक्षण सुरु होण्याच्या प्रतीक्षेत

बार्टीच्या जेईई, नीट प्रशिक्षणाचा मुहूर्त कधी निघणार; हजारो विद्यार्थी प्रशिक्षण सुरु होण्याच्या प्रतीक्षेत

नागपूर - दहावीचा निकाल लागून महिना होत आला आहे. परंतु बार्टीतर्फे देण्यात येणाऱ्या जेईई व नीटच्या मोफत प्रशिक्षणाला अद्याप सुरूवात झालेली नाही. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाशी संबंधित असल्याने ते वेळेत सुरू होणे अपेक्षित आहे. हजारो मागासवर्गीय विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असून त्याचा मुहुर्त कधी निघणार असा प्रश्न विचारला जात आहे.

दहावीच्या निकाल लागताच पालक व विद्यार्थी जेईई व नीटच्या तयारीला लागतात. त्यादृष्टीने इतर खाजगी संस्थामधे प्रशिक्षणाला एप्रिल महिन्यातच सुरुवात झाली आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या शेकडो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते खाजगी प्रशिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्यासाठी बार्टी मोठा आधार आहे व ते या प्रशिक्षणच्या आतुरतेने प्रतिक्षेत आहेत. प्रशिक्षण घेऊन हे गुणवंत विद्यार्थी देशातील नामांकित आयआयटी, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालय मध्ये प्रवेश प्राप्त करू शकतात. या वर्षीच्या प्रशिक्षणाला खूप जास्त विलंब होत असल्यामुळे शेकडो अनुसूचित जातीच्या विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. वर्ग १० वी चा निकाल लागून बरेच दिवस झाल्यामुळे विद्यार्थी व पालकाकडून बार्टीच्या अधिकृत प्रशिक्षण संस्थांमध्ये यावर्षीचे प्रशिक्षणाबाबत सातत्याने विचारणा होत आहे.

 ...तर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान
प्रशिक्षणाबाबत बार्टी कार्यालयामध्ये विद्यार्थी पालक दररोज विचारणा करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बार्टीद्वारे यावर्षी नवीन निविदा प्रक्रिया राबवणार असून त्यानंतर प्रशिक्षण सुरु होणार आहे. नवीन निविदा प्रक्रियेला किमान ५ ते ६ महिन्याचा कालावधी लागू शकतो. परिणामी विद्यार्थांचा अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर्षी बार्टीच्या जेईई साठी ४१९ प्रशिक्षणार्थी होते त्यापैकी जेईई मेन्समध्ये ९४ तर जेईई अडव्हान्समध्ये १९ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वेळेवर प्रशिक्षण मिळाल्याने हे शक्य झाले. चांगला निकाल असताना प्रशिक्षणास विलंब होत असेल तर अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांवर बार्टी प्रशासनाद्वारे जाणीवपूर्वक अन्याय करण्यात येत आहे, असे दिसून येईल. म्हणून विषयाची गंभीरता लक्षात घेत बार्टीने लवकरात लवकर प्रशिक्षण सुरु करावे. - आशिष फुलझेले, सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच

Web Title: When will Barty's JEE, NEET training begin?: Thousands of students are waiting for the training to start