विजेच्या तुटलेल्या तारा पूर्ववत करणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:24+5:302021-06-02T04:08:24+5:30
वादळामुळे खांब काेसळले : शेतीच्या कामात अडचणी लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : परिसरात १२ दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे चिचाळा (ता. ...

विजेच्या तुटलेल्या तारा पूर्ववत करणार कधी?
वादळामुळे खांब काेसळले : शेतीच्या कामात अडचणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिचाळा : परिसरात १२ दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे चिचाळा (ता. भिवापूर) शिवारातील सतीश पडाेळे, रा. चिचाळा यांच्या शेतात विजेचे पाच खांब व तार तुटून पडल्या आहेत. महावितरण कंपनीने वारंवार सूचना देऊनही त्या तार व खांब उचलले नाहीत. त्यामुळे शेतीची कामे व ओलित करण्यास अडचणी येत असल्याची माहिती सतीश पडाेळे यांनी दिली असून, या तार व खांब तातडीने उचलण्याची मागणी केली आहे.
सतीश पडाेळे यांच्या शेतातून विजेच्या तार गेल्या आहेत. या शिवारात १२ दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे त्यांच्या शेतातील विजेचे पाच खांब उन्मळून पडल्याने वीज तारही तुटल्या आहेत. त्यावेळी शेतात कुणीही नसल्यााने प्राणहानी किंवा कुणाला दुखापत झाली नाही. परिणामी, सतीश पडाेळे यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांकडील कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलित करण्यास अडचणी येत आहेत. ही समस्या साेडविण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना अनेकदा माहिती देऊन त्या तार उचलण्याची तसेच पाऊस येण्यापूर्वी काेसळलेले खांब पुन्हा व्यवस्थित गाडून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. परंतु, १२ दिवसापासून या समस्येकडे कुणीही लक्ष देत नाही, असा आराेप सतीश पडाेळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केला आहे. तार तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे ओलित करणे शक्य हाेत नसल्याने शेतातील भाजीपाल्याची पिके सुकत आहेत. पाऊस काेसळताच पेरणी करावी लागणार असल्याने त्या तार व पडलेले खांब अडसर ठरणार असल्याचेही शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांचे हाेणारे नुकसान व संभाव्य धाेका दूर करण्यासाठी ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणी सतीश पडाेळे, हेमंत महाकाळकर, ज्ञानेश्वर महाकाळकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.
...
तार चाेरी जाण्याची भीती
चिचाळा शिवारात चिचाळा-बाेटेझरी येथील ट्रान्सफार्मरमधून वीजपुरवठा केला जाताे. तार तुटल्या त्यावेळी वीज तार यामध्ये वीजप्रवाह प्रवाहित हाेता. ही बाब धाेकादायक ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मरजवळ जाऊन तारमधील वीजप्रवाह स्वत: बंद केला. शिवाय, याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. रात्रीच्या वेळी या शिवारात कुणीही राहत नसल्याने या ॲल्युमिनियमच्या तार चाेरीला जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.