कोणीच नसताना ‘हे’ होतात विसरलेल्यांचे सोबती फक्त शोधतच नाही, तर हरवलेलं अस्तित्वही परत मिळवून देतात

By नरेश डोंगरे | Updated: May 27, 2025 22:41 IST2025-05-27T22:40:56+5:302025-05-27T22:41:35+5:30

बक्कळ पैसा, नोकरी अन् छोकरी मिळविण्यासाठी समाजातील बहुतांश जण प्रयत्नरत असतानाच काही जण मात्र स्वत:ला विसरलेल्या मंडळींना शोधण्यासाठी धडपडत असतात.

When there is no one, 'these' become companions of the forgotten. They don't just search, they restore the lost existence. | कोणीच नसताना ‘हे’ होतात विसरलेल्यांचे सोबती फक्त शोधतच नाही, तर हरवलेलं अस्तित्वही परत मिळवून देतात

कोणीच नसताना ‘हे’ होतात विसरलेल्यांचे सोबती फक्त शोधतच नाही, तर हरवलेलं अस्तित्वही परत मिळवून देतात

नरेश डोंगरे

नागपूर : बक्कळ पैसा, नोकरी अन् छोकरी मिळविण्यासाठी समाजातील बहुतांश जण प्रयत्नरत असतानाच काही जण मात्र स्वत:ला विसरलेल्या मंडळींना शोधण्यासाठी धडपडत असतात. समाजदूत म्हणून काम करणारी ही मंडळी ‘प्रोफेशनल’ नसल्याने त्यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडत नाही. मात्र, जेव्हा त्यांचे कर्तृत्व पुढे येते तेव्हा समाज त्यांंना सॅल्युट केल्याशिवाय राहत नाही. आठ वर्षांत दोनशेवर मनोरुग्णांना मायेचा हात देणारी अशीच मंडळी ‘लोकमत’च्या नजरेस आली आहे. ही मंडळी स्वत:ला विसलेल्यांना फक्त शोधतच नाही तर त्यांना त्यांचे अस्तित्व परत मिळवून देण्यासाठीही झटते. 

स्वत:चा विसर पडल्याने जगभराच्या वेदना सोबत घेऊन फिरणारी मंडळी म्हणजे मनोरुग्ण. वेगवेगळ्या कारणांमुळे मनोरुग्ण झाल्यानंतर ते कोण, कुठले, याचे त्यांना स्मरणच उरत नाही. ते कशासाठी जगत आहे, त्याचेही त्यांना भान नसते. फाटके, मळके कपडे घातलेले किंवा उघडेनागडे दिसणारे हे बिचारे नुसतेच भटकत असतात. समाज, कुटुंबीयच काय, त्यांना स्वत:चीही पर्वा नसते. एकीकडे रखरखत्या उन्हात स्वत:ला चटके देत ते अनवाणी फिरतात, तर दुसरीकडे हाडं गोठविणाऱ्या थंडीत रात्री उशिरापर्यंत त्यांची उघडीनागडी भटकंती बघायला मिळते. कुणी दिले तर ठीक, नाही तर रस्त्यावर पडलेले काहीही उचलून खायचे अन् कोणतेही पाणी पिऊन पुन्हा पायाला भिंगरी बांधायची, अशी त्यांची दिनचर्या असते. याउलट वाईट स्थिती त्यांच्या कुटुंबीयांची असते. आपल्या माणसाला शोधण्यासाठी मनोरुग्णाचे नातेवाईक प्रचंड मानसिक आणि शारीरिक यातना सहन करीत असतात. अशांच्याच मदतीला धावून जाण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे काम नागपुरातील सुमंत नारायणराव ठाकरे, आशिष कांबळे, प्रीतम भामरे आणि त्यांचे मित्र करीत आहेत. एमएलसी फाउंडेशन, सिंहगर्जना युवा मंच, टीडब्ल्यूझेड फाउंडेशन, तसेच राज्यातील नागपूर, पुणे, ठाणे आणि रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने ते मनोरुग्ण शोधण्याची मोहीम राबवीत आहेत.

८ वर्षांत दोनशेवर मनोरुग्णांची मदत

या मित्रांनी गेल्या ८ वर्षांत राज्यात ठिकठिकाणी दोनशेवर मनोरुग्णांना शोधले. अलीकडे जानेवारी २०२५ सिंधुदुर्गमध्ये ७ मनोरुग्ण, फेब्रुवारी २०२५ मध्ये नागपूर जिल्ह्यात ९, मार्च २०२५ - कोल्हापूर, चिपळूणमध्ये २, एप्रिलमध्ये रत्नागिरीत ३ अशा २१ मनोरुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करून घेतले. त्यातील १३ जणांच्या कुटुंबीयांचाही पत्ता मिळवला अन् त्यांना त्यांचे गोकुळ परत मिळवून देण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे. ५ जणांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून, ३ जणांवर अद्यापही उपचार सुरू असल्याचे सुमंत सांगतो.

Web Title: When there is no one, 'these' become companions of the forgotten. They don't just search, they restore the lost existence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.