रामझुल्याशेजारचा पूल पाडण्याची परवानगी कधी?
By Admin | Updated: April 11, 2015 02:28 IST2015-04-11T02:28:40+5:302015-04-11T02:28:40+5:30
मध्य रेल्वेने रामझुल्याशेजारचा उड्डाण पूल पाडण्याची परवानगी दिलेली नाही. यामुळे रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे

रामझुल्याशेजारचा पूल पाडण्याची परवानगी कधी?
नागपूर : मध्य रेल्वेने रामझुल्याशेजारचा उड्डाण पूल पाडण्याची परवानगी दिलेली नाही. यामुळे रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मध्य रेल्वेला जुना उड्डाण पूल पाडण्याची परवानगी कधी देता, अशी विचारणा करून १७ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले.यासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. शासन व अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १७ जानेवारी २००६ रोजी रामझुला बांधकामाचा करार झाला आहे. करारानुसार संपूर्ण प्रकल्प ४२ महिन्यांत म्हणजे आॅगस्ट-२००९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, पहिल्या टप्प्याचेच काम पूर्ण करण्यास २०१४ साल उजाडले. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४६ कोटी रुपये होता. हा खर्च आता १०० कोटींवर गेला आहे. (प्रतिनिधी)
बनावट पावत्या बनवून चार कोटी हडपले
नागपूर : बनावट पावत्या सादर करून चार कोटींची फसवणूक करणाऱ्या संजीव एस. चंदन नामक आरोपीवर सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. चंद्रशेखर लखोटिया (वय ३८, रा. सोमलवार भवन माऊंट रोड) हे आर. लॉजिस्टीक प्रा. लि. चे महाव्यवस्थापक आहेत. संजीव चंदन त्यांच्या कंपनीचा ग्राहक होता. चंदनने लखोटिया यांच्या कंपनीच्या बनावट पावत्या तयार केल्या. त्याआधारे लखोटिया यांच्या कंपनीचा माल आपल्याकडे आहे असे दाखवून त्याने शासनाकडून ३ कोटी ९६ लाख रुपये लाटले. ७ आॅक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०१४ दरम्यानच्या या गैरव्यवहाराची तक्रार लखोटिया यांनी नोंदवली. त्यावरून तसेच न्यायालयाच्या आदेशावरून सदर पोलिसांनी चंदनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचे अंधेरी (उत्तर) परिसरात कार्यालय आहे.
दुकानात तोडफोड
नागपूर : श्यामनगरातील आर. के. ग्लास अॅन्ड अॅल्युमिनियम वर्कच्या दुकानात शिरून हेमंत नरेशप्रसाद श्रीवात्री आणि त्याच्या तीनसाथीदारांनी तोडफोड केली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. शंकर संजू बिहाडे (वय २३) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी हेमंत आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
यशोधरानगरात सुगंधी तंबाखू जप्त
नागपूर : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बिनाकी मंगळवारीतील सोमेश्वर वासुदेवराव पराते (वय २६) यांच्या घरी छापा मारून ७६, ५०० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू जप्त केला. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अनंत सुधाकर महाजन (वय ४२) यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.