चौकशी पूर्ण होताच न्यायालयात आरोपपत्र
By Admin | Updated: January 15, 2017 02:07 IST2017-01-15T02:07:40+5:302017-01-15T02:07:40+5:30
तुली पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातील आदिवासी समाजातील विद्यार्थिनींच्या शोषण प्रकरणाचा तपास

चौकशी पूर्ण होताच न्यायालयात आरोपपत्र
तुली पब्लिक स्कूल प्रकरण : दहा दिवसात तपास पूर्ण होण्याची शक्यता
नागपूर : तुली पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातील आदिवासी समाजातील विद्यार्थिनींच्या शोषण प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे. येत्या १० दिवसात तपास पूर्ण होण्याची शक्यता असून तपास पूर्ण होताच न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात येईल, असा दावा एसीपी आर. तायवाडे यांनी केला आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी आरोपी आचाऱ्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली होती. तेव्हा आचाऱ्याने शोषणाबाबत नकार दिला होता. परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. सूत्रांनुसार या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींची तक्रार खरी असल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे विचारपूस करण्यासाठी शाळा व वसतिगृहातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बोलावण्यात येऊ शकते. सर्वांचे बयान नोंदविल्यावर न्यायाालयात आरोपपत्र दाखल केले जाईल.
या प्रकरणाचा तपास जरीपटका पोलीस ठाण्याचे एसीपी आर. तायवाडे हे करीत आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विद्यार्थिनींची विचारपूस झाली आहे. यादरम्यान त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यात तथ्य असल्याचे दिसून येते. आरोपीचीही विचारपूस झाली आहे. सखोल चौकशी केल्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल.
वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींच्या शोषणप्रकरणी पोलिसांनी शाळा व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आदिवासी विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त एस. डब्ल्यू. सावरकर यांनी वसतिगृहाला भेट देऊन तुली पब्लिक स्कूलला कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. यासंदर्भातील माहिती विभागाला देण्याऐवजी लपवून ठेवण्यात आल्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनंतर आदिवासी विभागाकडूनही चौकशी केली जात आहे. दुसरीकडे हे प्रकरण दाबण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. घटनेपासूनच पालकांना या प्रकरणात तोंड न उघडण्याची ताकीद देण्यात आलेली आहे.(प्रतिनिधी)