काटोलमधील आरोग्य व्यवस्थेचा मेकओव्हर कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:16+5:302021-04-30T04:10:16+5:30
काटोल : काटोल तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या साडेसात हजारावर पोहोचली आहे. ग्रामीण भागात ३६ तर शहरात ५९ रुग्णांचा मृत्यू ...

काटोलमधील आरोग्य व्यवस्थेचा मेकओव्हर कधी?
काटोल : काटोल तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या साडेसात हजारावर पोहोचली आहे. ग्रामीण भागात ३६ तर शहरात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांचे जीव जात असताना त्यांना वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी ठरत आहे. त्यामुळे काटोल तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा मेकओव्हर करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
कोरोनाने अनेकांच्या घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गत आठवड्यात ऑक्सिजन अभावी उल्हास प्रभाकर इंगोले (४०), रामेश्वर रूपराव पारखी (५०), प्रमोद हेमराज सोनवणे (३०) या तीन रुग्णांनी काटोल डेडीकेटेड सेंटरवरच अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीने आणि नगरपरिषद प्रशासनाने कोविड केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयात जास्तीत जास्त ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यास पुढाकार घ्यावा अशी मागणी काटोलकर करीत आहेत.
काटोल शहरातील धन्वंतरी हॉस्पिटल, शुअरटेक हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय मिळून एकूण ४० ऑक्सिजन बेड आहेत. यातील धन्वंतरी व शुअरटेक हॉस्पिटल हे खाजगी असल्याने येथे नेहमीच बेड हाऊसफुल्ल असतात. हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची धाव सरकारी सेंटरवर असते. मात्र येथे ऑक्सिजन मशीन फक्त २० असल्याने अनेकांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे काटोल तालुक्यातील सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवत तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी स्थानिक विकास निधी कोरोना आपत्तीवर खर्च करणे गरजेचे आहे.
न.प. ने पुढाकार घ्यावा
जिल्ह्यात विकास कामात काटोल नगर परिषदेचा लौकिक आहे. ज्याप्रमाणे नगर परिषदेने शहर सुंदर करण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेतला तसाच आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शेवटी सुंदर शहरात वावरण्यासाठी नागरिक वाचणे आवश्यक आहेत.
----
तालुक्यात बाधितांची संख्या मोठी असताना केवळ एकच विलगीकरण केंद्र आहे. आताच्या परिस्थितीत रुग्ण वाचविण्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था हा एकच पर्याय आहे. त्यातही तालुका पिछाडीवर आहे. राजकीय नेत्यांनी गांभीर्य ओळखून वेळ जाण्याआधी ऑक्सिजन मशीन पुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा.
वैभव राऊत, रिधोरा